- कमलेश वानखेडेनागपूर : आघाडी सरकारच्या काळातील उपराजधानीमधील माजी मंत्र्यांचा विधानसभा गाठण्याचा मार्ग यंदाही वाटतो तितका सोपा नाही. काहींनी पक्षात तिकिटांसाठी संघर्ष करावा लागत आहे, तर काहींना मतदारसंघात भाजप-सेनेच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. काहींनी तर परिस्थिती पाहून यावेळी न लढण्याची भूमिका घेतली आहे.माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा एकेकाळी नागपुरात दरारा होता. त्यांच्याशिवाय शहरात काँग्रेसचे पानही हालत नव्हते. मात्र, २००९ मध्ये पूर्व नागपुरात व २०१४ मध्ये दक्षिण नागपुरातूनही पराभव झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला पानगळ लागली. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरील शाईफेक प्रकरणानंतर दीड वर्षे पक्षाबाहेर राहिलेल्या चतुर्वेदी यांची विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घरवापसी झाली. मात्र, त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाही. माजी मंत्री अनिस अहमद यांचाही क्रम असाच काहीसा आहे. पश्चिम व मध्य या दोन्ही मतदारसंघात लागोपाठ झालेल्या पराभवानंतर ते देखील लढण्यास फारसे इच्छुक नाहीत. त्यांनीही पक्षाकडे तिकीट मागितलेले नाही.माजी मंत्री काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत पुन्हा एकदा उत्तर नागपुरात कामाला लागले आहेत. साहित्यिक, विचारवंतांच्या भेटी घेत आहेत. रविवारी काँग्रेसच्या यादीत त्यांची उमेदवारीही जाहीर झाली आहे. मात्र, काँग्रेसमधील एक गट त्यांच्याविरोधात सक्रिय झाला आहे. या गटाने नुकतीच दिल्लीवारी करीत पक्षश्रेष्ठींना भेटून आपली व्यथा सांगितली. गेल्या वेळी पक्षांतर्गत विरोधकांनी हत्ती चालविल्याने राऊत तिसऱ्या क्रमाकांवर राहिले होते. यावेळीही राऊत यांच्या मार्गात काटे आहेत.माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक रामटेकमधून इच्छुक आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून त्या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, रामटेकमध्येही पक्षांतर्गत इच्छुकांना सांभाळण्याची कसरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बंग यांनी माघार घेत आपली हिंगण्याची गादी दुसºयाकडे सोपविली आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांना गेल्या वेळी काटोलच्या रिंगणात पुतण्यानेच मात दिली होती. यावेळी त्यांच्यासमोर घरातील नव्हे तर बाहेरचे आव्हान आहे. युतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी त्यांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.
Vidhan sabha 2019 : नागपूरमधील माजी मंत्री पुन्हा गाठणार का विधानसभा? रस्ता कठीण, काही लढण्यास अनिच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 6:10 AM