नरखेड (नागपूर) : महाराष्ट्रातील सरकार बेईमानाचे सरकार आहे. आम्ही निवडणुकीत प्रथम क्रमांक मिळविला तरी सरकार बाहेर आहे. शिवसेनेने दुसऱ्या पक्षांसोबत संसार थाटला. हे सरकार सहा महिन्यात खाली येणार. शेतकऱ्याला अतिरिक्त नुकसान भरपाई दिली नाही. कर्ज माफीत फसवेगीरी केली असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
५० लाख शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफी भाजपने मागील पंचवार्षिक योजनेत केली होती. परंतु या सरकारने सातबारा कोरा करण्याचे वचन दिले होते. ऑक्टोबरमध्ये नुकसान झालेले शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेत बसत नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला. शिवसेनेने शिव भोजन थाळी काढली. महाराष्ट्रातील फक्त १८ हजार लोकांना याचा फायदा होणार आहे. हा आघाडी सरकारचा मूर्ख बनवण्याचा धंदा आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मदत केली, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणूक भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ नरखेड तालुक्यतील खैरगाव येथील सभेत बोलत होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाकरिता भाजपची सत्ता जिल्हा परिषदेत येणे गरजेचे आहे. त्याकरिता भाजपच्या उमेदवारांना विजयी करा, असे आव्हान त्यांनी मतदारांना केले. सभेला माजी मंत्री परिणय फुके, राजीव पोतदार यांनी मार्गदर्शन केले. ऊकेश चौहान, मोवाड न.प .अध्यक्ष सुरेश खसारे इस्माईल शेख उपस्थित होते.