नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही शून्य सावलीचा अनुभव नागरिकांना येणार आहे. सूर्य बराेबर डाेक्यावर आणि सावली पायाखाली येणे म्हणजे शून्य सावली हाेय. महाराष्ट्रात बुधवार ३ मे पासून ३१ मे पर्यंत वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या दिवशी शून्य सावलीचा अनुभव येईल. नागपुरात २६ मे राेजी सावली पायाखाली येईल.
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्तामध्ये असणाऱ्या सर्व भूभागावर उत्तरायण व दक्षिणायन हाेताना सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदिरा पॉइंट येथे अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस येतो. तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो.
महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी १२ ते १२:३५ वाजताच्या दरम्यान सूर्य निरीक्षण करावे.
३ मे राेजी सावंतवाडी, शिराेडा, आंबाेली या ठिकाणी शून्य सावलीला सुरुवात हाेईल व पुढे वेगवेगळ्या शहरात त्याचा अनुभव घेता येईल. १७ मेपासून अहेरी, आलापल्लीसह विदर्भातील शहरात त्याची सुरुवात हाेईल. २० मे राेजी चंद्रपूर, वाशिम, वणी, मूल या ठिकाणी, २१ राेजी चिखली, गडचिराेली, सिंदेवाही, २२ राेजी चाळीसगाव, बुलढाणा, आरमाेरी, यवतमाळ, २३ ला खामगाव, अकाेला, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड, २४ ला शेगाव, वर्धा, उमरेड, २५ मे राेजी जळगाव, भुसावळ, अमरावती, २६ राेजी नागपूर, भंडारा, परतवाडा, तर २७ मे राेजी चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक आदी ठिकाणी शून्य सावली दिसेल. ३१ मे राेजी ताेरणमाळ व आसपासच्या परिसरात ती दिसेल.