लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात कर्नाटक सीमा वाद हा मुख्य मुद्दा राहील. परंतु या संवेदनशील विषयावर चर्चा करावी की कर्नाटकच्या विरोधात प्रस्ताव पारित करावा, हे सरकार अजून निश्चित करू शकले नाही.
सूत्रांनुसार सरकारचे म्हणणे आहे की, या विषयावर चर्चा झाली तर सत्तापक्ष व विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतील. त्यामुळे सभागृहात झालेल्या आरोप-प्रत्यारोपावरच अधिक चर्चा होईल. सरकारला नेमके हेच नकोय. त्यामुळे या विषयावर कुठलीही चर्चा न होता एकमताने प्रस्ताव पारित व्हावा, असे सरकारला वाटते. तर यावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज आहे.
दोन्ही सभागृहात एकमताने प्रस्ताव पारित करून महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट केली जावी. तसेच प्रस्तावाद्वारे आम्ही कायद्याचे पालन करणारे लोक आहोत. परंतु आमच्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे. आम्ही सीमेलगतच्या लोकांसह अखंड महाराष्ट्रासाठी कटिबद्ध आहोत. न्यायालयीन प्रक्रियेचाही सन्मान आहे. परंतु याचा हा अर्थ नाही की आम्ही आमच्या अस्मितेशी तडजोड करू, अशी भूमिका या प्रस्तावाद्वारे स्पष्ट केली जावी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"