Maharashtra Winter Session 2022: कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही; विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 12:37 PM2022-12-19T12:37:47+5:302022-12-19T12:50:40+5:30

महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव प्रवेशबंदीची मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात आज उपस्थित केला.

Maharashtra Winter Session 2022: Karnataka will not tolerate oppression; Opposition leader Ajit Pawar was furious in the assembly | Maharashtra Winter Session 2022: कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही; विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले

Maharashtra Winter Session 2022: कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही; विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले

googlenewsNext

नागपूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी  करुनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरुच आहेत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम कर्नाटक सरकारने केले आहे. यापुढे कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नसल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची जोरदार मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधान सभेच्या सभागृहात केली.

महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव प्रवेशबंदीची मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात आज उपस्थित केला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावाद अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. तरीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून वारंवार चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सीमावाद उफाळून आला असून दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण आहे. सीमावादाच्या या प्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यामुळे या प्रश्नावर योग्य तोडगा निघणे अपेक्षित होते. मात्र ते होताना दिसत नाही. गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर सुध्दा कर्नाटक सरकारची मुजोरी कायम आहे असा आरोप त्यांनी केला. 

त्याचसोबत बेळगावमध्ये दि. 19 डिसेंबर 2022 पासून कर्नाटक विधीमंडळाचे अधिवेशन होत आहे. दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये या दिवशी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांना बेळगावात प्रवेश नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोणत्याच नेत्यांना तेथे जाता येऊ नये यासाठी बेळगावच्या हद्दीतील कोगनोळीसह २१ सीमानाक्यांवर हजारो पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे अशी माहिती अजितदादांनी सभागृहात दिली. 

दरम्यान, कर्नाटकने आपली आडमुठी भूमीका कायम ठेवली आहे, दि. १९ डिसेंबर रोजी बेळगावात येण्याची परवानगी खासदार धैर्यशील माने यांनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली होती. परंतु आपल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे सांगत त्यांना बेळगावात बंदी करण्यात आली आहे. कर्नाटक राज्याची आणि बेळगाव जिल्हा प्रशासनाची महाराष्ट्र आणि मराठी विरोधी भूमीका समोर येत असल्याने मराठी भाषकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या दडपशाहीच्या माध्यमातून व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. कर्नाटक सरकारची ही दडपशाही सहन केली जाणार नाही असा इशाराही संतापलेल्या अजित पवार यांनी दिला. 

Web Title: Maharashtra Winter Session 2022: Karnataka will not tolerate oppression; Opposition leader Ajit Pawar was furious in the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.