नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे, पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन वादळी सुरू आहे. विरोधकांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करत मंत्रीपदाचा राजीनामा मागितला. तर कर्नाटक विरोधी प्रस्ताव संमत करण्याची मागणी केली. आज अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर खोचक टोले लगावले. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. मागच्या पाच महिन्यापूर्वी शिवसेनेत बंड का झाले याची आठवण मुख्यमंत्री शिंदे यांनी करुन दिली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत पुलोद सरकारची आठवण करुन दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात शिवसेनेत झालेल्या फुटीचे कारण सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत आम्हाला सर्वांना या फुटीचे माहित आहे, आम्हाला त्याच काही देणंघेणं नाही, असा टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
'शरद पवार यांनीही ७८ साली पुलोद स्थापन केलं होतं. हशु अडवाणी, उत्तमराव पाटील त्या मंत्रिमंडळात होते. त्यावेळी कधीही मुख्यमंत्र्यांची भाषणं राजकीय होत नव्हती. एखाद दुसरा चिमटा काढला तर आम्ही समजू शकतो.
बाहेर ज्यांना सोडून आला, त्यांच्या वृत्तपत्रात काही बातम्या येणार, ते तुम्ही मनाला लावून घेणार आणि ते तुम्ही इथे सांगणार, याच आम्हाला काय देणंघेणं आहे, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
'आपला महाराष्ट्र आहे, शाहू-फुले-आंबेडकर, युगपुरूष शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो. यशवंतराव चव्हाणांची शिकवण काय बघा, आचार्य अत्रे किती टीका करायचे माहीत आहे, या टीकेला यशवंतराव चव्हाण दिलदारपणे घ्यायचे, असंही अजित पवार म्हणाले.
'मुख्यमंत्री महोदय, तुम्ही याच्यातून बाहेर या. तुम्हाला बहुमत मिळालं आहे. तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री झाला आहात. असल्या छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही तुमचं मन जास्त रमवू नका. हे राज्यातल्या जनतेला अजिबात आवडणार नाही. मला काम कसं मिळेल, बेरोजगारी कशी कमी होणार आहे, शेतकऱ्यांसंदर्भात काय भूमिका घेतली जाणार, याकडे त्यांचं लक्ष आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
'तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करताय, जाऊ द्या मुलं आहेत म्हणून सोडून द्या. दुसऱ्या कार्यकर्त्यांना प्रवक्ते म्हणून बोलायला सांगा. तुम्ही तुमचं भाषण परत बघा. आम्हालाही वाटतं ज्यांनी त्या खुर्चीवर बसावं त्यांनी राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवावं, असंही अजित पवार म्हणाले.
'नरेंद्र मोदी, अमित शाहांशी तुमचे चांगले संबंध झाले आहेत. तिकडनं राज्याच्या भल्याकरिता काय आणता येईल, कर्नाटकच्या भूमिकेबद्दल एकी करण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.