नागपूरः शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, अतिवृष्टी या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करा, अशी मागणीच त्यांनी सत्ताधाऱ्यांकडे केली आहे. विधानसभेच्या बाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आमचं काळजीवाहू सरकार होतं, त्यावेळी आम्ही कॅबिनेटमध्ये 10 हजार कोटी रुपयांना मान्यता दिली होती. त्यानंतर आमचं सरकार नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यासंदर्भातले जीआर काढू शकलो नाहीत.जयंत पाटील म्हणाले आम्ही सहा हजार कोटी रुपये दिले आहेत. 93 लाख हेक्टर जमीन म्हणजे 23 हजार कोटी रुपये किमान हे त्यांनी द्यायला पाहिजे होते. साडेपाच ते सहा हजार कोटी केवळ त्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत. त्यामुळे 25 हजार रुपये हेक्टरानं 23 हजार कोटी रुपये कधी देणार हे आम्ही त्यांना विचारलं आहे. केंद्राकडे सर्व गोष्टी टोलवण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा सुरू आहे. केंद्र सरकारचे नियम ठरलेले असतात, आमचेही पाच वर्ष सरकार होतं, केंद्रानं तसे आम्हाला पैसे दिले आहेत. आघाडी सरकारपेक्षा जास्त पैसा हा मोदी सरकारनं राज्याला दिला आहे.पण त्याचे नियम आणि निकष ठरलेले होते. तुम्ही घोषणा करताना स्वतःच्या जिवावर केली होती की केंद्र सरकारच्या जिवावर केली होती, याचंदेखील उत्तर मुख्यमंत्री आणि जयंत पाटलांनी दिलं पाहिजे. आपलं अपयश लपवण्याकरिता केंद्र सरकारचं नाव घेणं हे योग्य नाही . आम्ही आमच्या भरवशावर शेतकऱ्यांना मदत दिली होती. अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला आम्ही राज्याच्या भरवशावर मदत केली आहे. तुमची मागणी होती, तुम्ही किमान समान कार्यक्रम तयार केला. किमान समान कार्यक्रमात अवकाळी शेतकऱ्यांना मदत आणि कर्जमाफीचे मुद्दे ठरवण्यात आले होते. पण शेतकऱ्यांना अद्यापही तुम्ही मदत देऊ शकलेला नाहीत, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
'केंद्र सरकारच्या जिवावर शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 12:43 PM