स्मृती व्याख्यानमाला : नागनाथ कोत्तापल्ले यांचे प्रतिपादन नागपूर : समाजातील अनैतिक रूढी, परंपरा नष्ट व्हाव्यात. सर्वांना समान वागणूक असावी, कुणावरही अन्याय-अत्याचार होऊ नयेत, असे विचार मांडणारे अनेक जण आधुनिक भारतात होऊन गेले. त्यापैकी अनेकांनी त्यादृष्टीने कामेही केली. परंतु समाजातील वास्तव ताकदीने मांडून प्रबोधनाची चळवळ प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले. त्यामुळे ते केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते देशातील समाज परिवर्तनाचे आद्य शिल्पकार ठरतात, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आज येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे सोमवारी सायंकाळी दीक्षांत सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. ‘भारतीय समाज परिवर्तनाचे आद्य शिल्पकार : महात्मा ज्योतिबा फुले’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते. प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर प्रमुख अतिथी होते. डॉ. कोत्तापल्ले यांनी सुरुवातीलाच तत्कालीन इंग्रजांच्या काळापूर्वीची परिस्थिती आणि इंग्रज भारतात आल्यावर देशात होत असलेल्या वैचारिक परिवर्तनाचा आढावा सादर केला. नवीन विचार समाजात रुजू होत होते. अनेक महापुरुष संत-महात्मे आपापल्यापरीने समाज सुधारणाबाबत भाष्य करीत होते. महात्मा फुले यांनी मात्र आपले विचार ताकदीने मांडले. धर्माची समीक्षा केली. अंधश्रद्धेचा निषेध केला. कुठल्याही ग्रहांचा, कुंडलीचा परिणाम होत नाही. दैव, भविष्य यांना नाकारले. धर्माची समीक्षा करताना धर्मातील थोतांड त्यांनी ताकदीने मांडले. स्त्रीमुक्ती आणि अस्पृश्यतेबाबत ते केवळ बोलले नाही तर ते नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा उघडली. अस्पृश्य, शेतकरी आणि कामगार यांच्या शोषणाचा प्रश्न त्यांनी सर्वप्रथम मांडला. अस्पृश्य, मजूर व शेतकरी यांचे शोषण कसे व कोणकोणत्या माध्यमातून होते, ते त्यांनी उलगडून सांगितले. यातूनच पुढे नारायण मेधाजी लोखंडे यांनी कामगारांची चळवळ उभी केली. ही चळवळ जगातील पहिली चळवळ होती. नारायण लोखंडे हे महात्मा फुले यांचे अनुयायी होते, हे विशेष, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या समस्यांनी आज उग्र रूप धारण केले आहे. या समस्या सोडविण्यासाठी आपल्याला महात्मा फुलेंच्याच ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो, असे डॉ. विनायक देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले. संचालन डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. सहायक उपकुलसचिव अशोक साळवे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
महात्मा फुले समाज परिवर्तनाचे आद्य शिल्पकार
By admin | Published: December 30, 2014 12:57 AM