नागपूर : गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीत पीरिपाला मानसन्मान मिळाला नाही. सत्तेत वाटाही मिळाला नाही. पक्षाचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे येत्या काळात नव्या राजकीय मित्रांचा शोध घेतला जाईल, अशी भूमिका पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मांडली.
प्रा. कवाडे म्हणाले, पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक ३ ऑक्टोबर रोजी नागपुरात होत आहे. या बैठकीत कोणता पक्ष आपल्याला न्याय देऊ शकतो, कोणता पक्ष आपल्या पक्षाच्या अजेंड्यातील जास्तीत जास्त मुद्यांवर सहमती दर्शवू शकतो, यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दलितांवरील अत्याचारात वाढ होत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली राज्यस्तरीय दक्षता समिती व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती अद्याप स्थापन झालेली नाही. सरकारने यावर वेळीच लक्ष दिले नाही तर आम्हीच पक्षातर्फे प्रतिबंधात्मक कृती आराखड्याची आखणी करू व भीमसैनिकांचे जथे तयार करू, असा इशाराही त्यांनी दिला.
६ मे २०२१ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मागासवर्गीयांना पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता शिंदे सरकारने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणीही कवाडे यांनी केली.
येत्या ४ ऑक्टोबर रोजी नागपूरच्या धंतोलीतील लक्ष्मी मंगल कार्यालयात पीरिपाचे राष्ट्रीय अधिवेशन व भीमसैनिकांचा ४२ वा देशव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी ३ ऑक्टोबरला पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत रिपब्लिकन पक्षांचं संघटन, आरक्षण, दलितांवरिल अत्याचार, बेरोजगारी, सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण आदी विषयांवर आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर ते मुंबई लाँगमार्च
- समाजमनात जाणीवपूर्वक जातीय-धार्मिक तेढ व द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादाच्या बुरख्याआडृून सांस्कृतिक दहशतवाद पेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या विरोधात जनमानसात जागृती निर्माण करण्यासाठी येत्या जानेवारीत पुण्यभूमी कोल्हापूर ते चैत्यभूमी मुंबईपर्यंत लाँगमार्च काढण्याचा संकल्प कवाडे यांनी व्यक्त केला.