आपणच पंक्चर करणार का ? ( )
राष्ट्रवादी-सेनेच्या पळवापळवीने काँग्रेसचा पारा चढला : प्रदेश समन्वय समितीकडे करणार तक्रार
नागपूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. तीनचाकी रिक्षाचे सरकार असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने होते. असे असताना शिवसेना व राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळता काँग्रेसचे लोक पळविण्यास सुरुवात केली आहे. यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करीत, मित्रपक्षच सत्तेची रिक्षा पंक्चर करणार का, असा सवाल केला आहे. आता काँग्रेसतर्फे राज्याच्या समन्वय समितीकडे याची गंभीर तक्रार केली जाणार आहे.
नागपूर शहर काँग्रेस समितीच्या कार्यकारिणीची बैठक सोमवारी देविडया भवनात पार पडली. बैठकीला उपस्थित असलेले नवनियुक्त प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांच्यासमोरच शिवसेना व राष्ट्रवादीकडून काँग्रेसला सुरुंग लावून लोक पळविले जात असल्याकडे काही पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांचे लक्ष वेधले. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून फोडाफाडीचे राजकारण केले, तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असे करीत असतील, तर आपण मुकाट्याने हे सहन करायचे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. अशात काँग्रेसचे वजनदार लोक तोडायचे व नंतर महाविकास आघाडीचा प्रस्ताव ठेवून त्यांनाच तिकीट द्यायचे व पक्ष वाढवायचा, असा शिवसेना व राष्ट्रवादीचा ‘गेम प्लॅन’ असल्याचेही सांगण्यात आले.
शेवटी कार्याध्यक्ष व शहर अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांच्या भावनांची दखल घेतली. तिन्ही पक्षांच्या कारभारासाठी राज्यस्तरावर समन्वय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत शिवसेना व राष्ट्रवादीकडून सुरू असलेल्या पळवापळवीची गंभीर तक्रार केली जाईल, सोबतच असेच सुरू राहिले, तर काँग्रेसचेही हात मोकळे सोडण्याची परवानगी श्रेष्ठींकडे मागितली जाईल, असे नेत्यांनी आश्वस्त केले.
बैठकीला आ. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, अतुल लोंढे, गिरीश पांडव, उमेश डांगे यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष, नगरसेवक उपस्थित होते.
काँग्रेसला कुणी रोखले ?
राष्ट्रवादीने काढला चिमटा
- फोडाफोडीच्या राजकारणावर काँग्रेसने व्यक्त केलेल्या नाराजीबाबत राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे. काँग्रेसला त्यांचे लोक सांभाळता येत नसतील, त्यांना राष्ट्रवादी अधिक सोयीची व पाठबळ देणारी वाटत असेल, तर त्यात राष्ट्रवादीची चूक काय, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला. गेल्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांना काँग्रेसने तिकीट दिले. सध्या त्यातील काही काँग्रेसचे नगरसेवकही आहेत. तेव्हा काँग्रेसला ही चिंता का वाटली नाही? सरकार महाविकास आघाडीचे असले तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याची मुभा आहे. ते करण्यासाठी काँग्रेसला कुणी रोखले, असा चिमटाही राष्ट्रवादीने काढला आहे.