नागपूर : येत्या रविवारी पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावर आयोजित महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेविरुद्ध बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी होण्याची शक्यता आहे.
धीरज शर्मा व इतर काही नागरिकांनी ही याचिका दाखल केली आहे. स्थानिक नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेता या मैदानावर सभा घेण्यास मनाई करण्यात यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आदी ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचाही या सभेला विरोध आहे. हे मैदान खेळासाठी विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे मैदानावर राजकीय सभा घेतली जाऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. सभेला विरोध करण्यासाठी दर्शन काॅलनी सद्भावनानगर क्रीडा मैदान बचाव समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे.