नागपूर :महावितरणची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे वसुलीशिवाय आता पर्याय नाही, असे स्पष्ट करीत चालू बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापा, असे निर्देश महावितरणचे प्रबंध संचालक विजय सिंघल यांनी येथे दिले.
शुक्रवारी नागपुरात सिंघल यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, पुष्पा चव्हाण, राजेश नायक व सुनील देशपांडे उपस्थित होते. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यासह नागपूर शहरातील सर्व एसडीओसुद्धा उपस्थित होते.
यावेळी सिंघल म्हणाले, कंपनीची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. कंपनीवर प्रचंड कर्ज झाले आहे. नवीन कायद्याने कर्ज घेण्याची क्षमताही कमी झाली आहे. अशा वेळी वीज बिलांची वसुली अत्यावश्यक झाली आहे. बिल न भरणाऱ्यांची वीज कापण्याशिवाय आता पर्याय नाही. कंपनी राहिली तर कर्मचाऱ्यांची नोकरी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सदोष मीटरच्या वाढत्या संख्येवर नाराजी व्यक्त केली.
तर महाराष्ट्र अंधारात बुडेल
सिंघल यांनी सांगितले की, आता परिस्थिती बदललेली आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांनी कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबाबत माहिती देऊन बिल भरण्यास प्रोत्साहित करायला हवे. आता दररोज पैसे द्यावे लागतात. केंद्राकडून खरेदी केलेल्या विजेचे पैसे जर वेळेवर भरले नाही, तर त्यांच्याकडून पुरवठा थांबू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र अंधारात बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही.