६९ वीजखांब जमीनदोस्त : वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रविवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसाचा महावितरणच्या वीज यंत्रणेला जबर फटका बसला. यात काँग्रेसनगर आणि बुटीबोरी विभागात उच्चदाब वीज वाहिनीचे १५ तर लघुदाब वीज वाहिनीचे ५४ असे एकूण ६९ वीजखांब जमीनदोस्त झाले. यामुळे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा प्रभावित झाला होता, मात्र महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करीत सुमारे ४० टक्के भागातील वीजपुरवठा अवघ्या अर्ध्या तासात पूर्ववत केला. तसेच रात्री ९ वाजतापर्यंत प्रभावीत भागापैकी ९० टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले होते. उर्वरित भागातील वीजपुरवठा मध्यरात्रीपर्यंत सुरू करण्यात आला होता. या वादळामुळे ६९ वीजखांबांसोबतच ८.११ किमी लांबीची वीज वाहिनी क्षतिग्रस्त झाली आहे. तसेच ११ वितरण रोहित्रे नादुरुस्त झाली असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यातच अनेक वीजतारांमध्ये झाडाच्या फांद्या आणि जाहिरातींचे होर्डिंग्ज पडल्याने दुरुस्तीच्या कामात व्यत्यय येत आहे. मात्र तरीही महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संपूर्ण रात्रीचा दिवस करीत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळविले. यात महत्त्वाचे म्हणजे, महावितरणने योग्यरीत्या मान्सूनपूर्व तयारी केल्याने वादळातही महावितरणच्या कुठल्याही उपकेंद्रात बिघाड झाला नाही, शिवाय त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. ग्राहकांना आवाहन महावितरणने ग्राहकांसाठी कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय महावितरणच्या मोबाईल अॅपवरूनही वीज बंद असल्याची तक्रार नोंदविता येते. त्यामुळे ग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जागेतील झाडे किंवा लांब फांद्या वादळी व मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. असा संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या झाडांची किंवा फांद्यांची संबंधितांनी महानगरपालिकेची परवानगी घेऊन कटाई करावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
महावितरणला वादळाचा फटका
By admin | Published: May 30, 2017 1:39 AM