लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विनापरवानगी सातत्याने कामावर गैरहजर असणाऱ्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ५२ कर्मचाऱ्यांवर महावितरणने कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली असून कामात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिला आहे.महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या पाचही परिमंडळातील मानव संसाधन विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी कामावर सातत्याने गैरहजर असणाऱ्या विदर्भातील ५२ कर्मचाऱ्यांवर तात्काळ कामावरून कमी करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक यांनी दिले. या कर्मचाऱ्यांमध्ये अकोला परिमंडलातील चार, अमरावती आणि चंद्रपूर परिमंडलातील प्रत्येकी १०, गोंदिया परिमंडलातील ११ तर नागपूर परिमंडळातील १७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये वर्ग १ ते ४ मधील अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.शिस्तभंगाचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांवर सहा महिन्यांत सुनावणी घेत यथोचित कारवाई पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच अशी प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.या बैठकीला नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रफीक शेख यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक वैभव थोरात, सहायक महाव्यवस्थापक पांडुरंग वेळापुरे, रूपेश देशमुख, असित ढाकणेकर, शशिकांत पाटील व महेश बुरंगे यांच्यासह वरिष्ठ व्यवस्थापक व व्यवस्थापक स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.
महावितरण नागपूर परिक्षेत्रातील ५२ कर्मचाऱ्यांना दाखविणार घरचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 8:52 PM
विनापरवानगी सातत्याने कामावर गैरहजर असणाऱ्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ५२ कर्मचाऱ्यांवर महावितरणने कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली असून कामात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिला आहे.
ठळक मुद्देभालचंद्र खंडाईत : विनापरवानगी सातत्याने गैरहजर राहणे भोवले