लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरणच्या वीजवाहिनीत असलेला दोष दुरुस्त करण्यासाठी जनमित्राने वीजपुरवठा बंद केल्याने चिडलेल्या एका गावगुंडाने मारहाण केल्याची घटना हिंगणा परिसरात घडली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना मोहपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेलगाव येथे घडली.महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या हिंगणा शाखा कार्यालयात कार्यरत असलेले प्रकाश रामटेके रा. जरीपटका, नागपूर हे आपल्या सहकाऱ्यांसह बुधवारी राजीवनगर परिसरात सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वीजवाहिनीतील झालेला बिघाड दुरुस्तीसाठी गेले होते. यासाठी त्यांनी परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी बंद केला. वीजपुरवठा बंद केल्याचे समजताच या परिसरात गुंड प्रवृत्तीच्या मोनू खान नामक इसमाने मला न विचारता वीजपुरवठा बंद का केला? असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रकाश रामटेके यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर आरोपी मोनू खान याच्या विरोधात भादंविच्या कलम २९४, ५०६ (ब ), ३२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.याअगोदरदेखील क्षुल्लक कारणावरून नागपूर ग्रामीण भागात महावितरणच्या जनमित्रावर हल्ले झाले असता पोलिसात तक्रार दाखल केल्यावर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.आरोपी खान याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याच्या विरोधात अजामीनपात्र कलमाचा वापर करून महावितरण जनमित्रांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. अशाच प्रकारची घटना मोहपा उपविभागातील तेलगाव परिसरात २८ मे रोजी घडली. येथे अर्जुन हेडाऊ यांना मारहाण करण्यात आली असून, महावितरणकडून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यात जनमित्रांना गुंडांकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 7:26 PM
महावितरणच्या वीजवाहिनीत असलेला दोष दुरुस्त करण्यासाठी जनमित्राने वीजपुरवठा बंद केल्याने चिडलेल्या एका गावगुंडाने मारहाण केल्याची घटना हिंगणा परिसरात घडली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना मोहपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेलगाव येथे घडली.
ठळक मुद्देमहावितरण : पोलिसात गुन्हा दाखल