नागपूर : अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाऊंडेशनचे तीन मानाचे पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार, ज्येष्ठ पत्रकार व लेखक श्याम पेठकर, सामाजिक कार्यकर्ता व प्रकाशक अरुणा सबाने या नागपुरातील तीन नामवंतांना मिळाले आहेत. या तिन्ही ज्येष्ठांपर्यंत पोहोचून आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांचा सत्कार केला. महेश एलकुंचवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन पालकमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला तर श्याम पेठकर व अरुणा सबाणे यांचा भरतनगर येथील वनराई कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देशमुख, नीलेश खांडेकर, प्राध्यापक जवाहर चरडे, वंदना वनकर उपस्थित होते. महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे महेश एलकुंचवार यांना दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव सन्मान मिळाला आहे तर विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकल महिलांवर आधारित तेरवं या नाट्यसंहितेसाठी रा. श. दातार नाट्य पुरस्कार श्याम पेठकर यांना मिळाला आहे. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अरुणा सबाने यांना कार्यकर्ता (प्रबोधन ) पुरस्कार मिळाला आहे.
महेश एलकुंचवार, श्याम पेठकर, अरुणा सबाने यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 4:05 AM