नागपूर : पंतप्रधान नरेंद्र माेदी सध्या युराेपीय देशांच्या दाैऱ्यावर असून, यादरम्यान ते इटलीमध्ये याेग व आयुर्वेदाचा प्रचारप्रसार करणारे मूळचे नागपूरचे रहिवासी माही गुरुजी यांची भेट घेणार आहेत. राेम शहरात ही भेट हाेणार असून, गृहमंत्रालयाकडून भेटीचे निमंत्रण माही गुरुजींना देण्यात आले असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.
माही गुरुजी उर्फ महिंद्रा सिरसाठ हे मूळचे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील साहेबराव सिरसाठ हे नागपूर पाेलीस दलात एएसआय पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांचे कुटुंब सीताबर्डी येथील क्वार्टरमध्ये राहत हाेते. २५ वर्षांपूर्वी काही कामानिमित्त ते इटलीला गेले हाेते. त्यावेळी या देशातही भारतीय संस्कृती व आयुर्वेद उपचार पद्धतीचा प्रचार करावा, असा साक्षात्कार त्यांना झाला. तेव्हापासून त्यांनी भारत साेडून इटलीला आपले कार्य सुरू केले.
मागील २५ वर्षांपासून इटलीच नाही तर युराेपीय देशांमध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीसह याेग आणि अध्यात्माचा ते प्रचार, प्रसार करीत आहेत. वेगवेगळ्या देशात माेठमाेठ्या याेग शिबिरांचे आयाेजन केले जात असून, अनेक देशांत त्यांचे अनुयायी आहेत. याेग आणि आयुर्वेदिक उपचारातून त्यांनी अनेकांचे कॅन्सरसारखे आजार बरे केल्याचा दावा केला आहे. एवढ्या वर्षांपासून परदेशात राहत असतानाही भारतीय संस्कृतीशी जोडलेले आहेत. एक भारतीय व तेही नागपूरची व्यक्ती युराेपीय देशात याेग, आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करीत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. त्यांना पंतप्रधान माेदींकडून भेटीचे निमंत्रण आल्याने त्यांच्यात उत्साह असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
काेराेना पीडितांसाठी याेग
काेराेनाच्या सुरुवातीच्या काळात इटली देश सर्वाधिक प्रभावित झाला हाेता. मात्र, त्यावेळी माही गुरुजी यांच्या केंद्रातील साधक या जीवघेण्या आजारापासून सुखरूप हाेते. याेग आणि आयुर्वेदामुळे काेराेनापासून सुरक्षित राहत असल्याचा संदेश त्यांनी दिला व या काळात इटलीतील नागरिकांची याेग प्रशिक्षणाद्वारे सेवा केली हाेती.