नागपूर : होळी आधीच देशभरातील जनतेचा रंगाचा बेरंग झाला आहे. घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर महागले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयाने महागले आहेत. तर व्यासायिक गॅस सिलेंडर ३५० रुपयांनी महागला आहे. महागाईने आधीच सामान्य नागरिक त्रस्त असताना ही दरवाढ करण्यात आल्याने सर्व सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. या दरवाढीच्या विरोधात नागपूर ग्रामीण महिलाकाँग्रेसच्या वतीने उमरेड येथे आंदोलन करण्यात आले. महिलांनी रस्त्यावर चुलीवर स्वयंपाक बनवून गॅस दरवाढीला विरोध दर्शविला.
ग्रामीण महिला काँग्रेसच्या अध्यक्ष व जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या नेतृत्वात उमरेड शहर महिला काँग्रेसतर्फे उमरेड भिसि नाका चौक येथे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर चुली मांडून स्वयंपाक केला व गॅस दरवाढीचा निषेध केला. काँग्रेसचे देशात सरकार असताना ५५० रुपयात मिळणारे सिलेंडर आज ११५० रुपयावर गेले आहे. या वाढत्या महागाईच्या विरोधात चुली मांडून त्यांनी निषेध व्यक्त केला.
यावेळी उमरेड शहरच्या महिला काँग्रेसचे अध्यक्ष योगिता ईटणकर, सुरेखा रेवतकर, कल्पना हवेलीकर, गीतांजली नागभीडकर, श्वेता मोहोड, श्वेता भिसे, प्रियंका लोखंडे, वनिता भुते, सविता भुरे, सुनिता थुटान, प्रसन्ना गुजरकर, आशा शिरसीकर यांच्यासह उमरेड विधानसभेच्या सर्व महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व उमरेड काँगेस कमिटीचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले.