नागपूर : महिला परिचरांना नियमित सेवेत घ्या, या मागणीसाठी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाने काढलेला मोर्चा गुरुवारी टेकडी रोडवर अडून बसला. रस्त्यावरच रात्र काढल्याने शुक्रवारी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. विभागाचे सहसंचालक डॉ. दुर्गादास पांडे यांनी जानेवारी महिन्यात बैठक लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.
राज्यभरातील २७ जिल्ह्यांतील महिला परिचरांनी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या मोर्चातून गुरुवारी विधिमंडळाला धडक दिली. आपण पूर्णवेळ काम करतो तरीही अर्धवेळ नियुक्ती आदेश देण्यात येत असल्याचा आरोप करीत त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. रात्र होऊनही आरोग्यमंत्र्यांनी मोर्चाला भेट दिली नाही. यामुळे मोर्चेकऱ्यांनी संपूर्ण रात्रच रस्त्यावर काढली.
आज शुक्रवारी याची माहिती आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांना मिळताच त्यांनी सकाळी ११ वाजता मोर्चाला भेट दिली. त्यांच्यासोबत आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. दुर्गादास पांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार व नोडल अधिकारी डॉ. नितीन गुल्हाने होते. परंतु जोपर्यंत मागण्यांचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मोर्चा मागे हटणार, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली. यामुळे दुपारी सहसंचालक डॉ. पांडे यांच्या स्वाक्षरीचे पत्र मोर्चेकऱ्यांना देण्यात आले. यात आरोग्यमंत्र्याच्या स्वीय सचिवांनी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मागण्यांना घेऊन बैठक लावण्याची हमी दिली. त्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.
-नाही तर मुंबईत मोर्चा
मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या मंगला मेश्राम म्हणाल्या, जानेवारी महिन्यात मागण्यांवर बैठक न घेतल्यास आम्ही सर्व महिला परिचर मुंबईत मोर्चा काढू. हक्काच्या मागण्यांसाठी लढा देऊ.
- सात महिलांची प्रकृती बिघडली
मोर्चात सहभागी झालेल्या सात महिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्या जिवाला धोका झाल्यास याची जबाबदारी आरोग्य विभागाची राहील, असा इशाराही मंगला मेश्राम यांनी दिला.