नागपूर : अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा चंद्रपूर वन अकादमीचे संचालक महीप गुप्ता यांची प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये सेवानिवृत्त झाल्यामुळे महीप गुप्ता यांची त्यांच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वने व पर्यावरण विभागाने बदल्यांबाबतचे परिपत्रक गुरुवारी जाहीर केले आहे. यात प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) विकास गुप्ता यांची महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. के. पी. सिंग सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागेवर विकास गुप्ता यांची वर्णी लागली आहे.
परिपत्रकानुसार नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास यांची प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) पदावर, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक (औषधी वनस्पती) एम. श्रीनिवास रेड्डी यांची अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा संचालक चंद्रपूर वन अकादमी पदावर, उपवनसंरक्षक (कार्य आयोजना) डॉ. विनिता व्यास यांची महाराष्ट्र जनूक कोष (विशेष कक्ष) महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूरच्या संचालक पदावर बदली करण्यात आली आहे.
याशिवाय ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरचे उपसंचालक (बफर) जी. गुरुप्रसाद यांची कोल्हापूरच्या उपवनसंरक्षक (प्रादेशिक) पदावर, अकोटचे उपवनसंरक्षक (वन्यजीव) एस. नवकिशोर रेड्डी यांची सावंतवाडीच्या उपवनसंरक्षक (प्रादेशिक) पदावर, बल्लारशा मार्कंडा येथील महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक कुशाग्र पाठक यांची ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरच्या (बफर) उपसंचालक पदावर, महाराष्ट्र वनविकास महामंडळ भंडाराचे विभागीय व्यवस्थापक नितीन कुमार सिंग यांची धुळे येथे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) पदावर आणि कोल्हापूर येथील उपवनसंरक्षक (कार्य आयोजना) नीता कट्टे यांची सांगलीच्या उपवनसंरक्षक (प्रादेशिक) पदावर बदली करण्यात आली आहे.