लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोची टेलिफोन लाईन हॅक करून त्या माध्यमातून अज्ञात आरोपींनी शेकडो इंटरनॅशनल कॉल केले. १ मार्च ते ३१ मार्चदरम्यान झालेल्या फोन कॉल्सचे बिल ९ लाख ८४ हजार रुपये आल्याने मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकल्प व्यवस्थापकांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नागपुरात सिव्हिल लाईन्समध्ये ‘मेट्रो हाऊस’ आहे. येथील कार्यालयात अत्याधुनिक उपकरणे आणि टेलिफोन यंत्रणा बसविण्यात आली आहे. ईपीडीएक्स इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेच्या माध्यमातून कार्यालयातील टेलिफोन लाईन हॅक करून अज्ञात आरोपींनी देश-विदेशात भरमसाठ कॉल केले. एका महिन्याचे इतके बिल कसे आले, यावर मंथन सुरू झाले. नंतर महामेट्रोच्या कार्यालयातील टेलिफोन यंत्रणा हॅक करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यामुळे अवघे मेट्रो रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. वरिष्ठ पातळीवर विचारविमर्श केल्यानंतर अॅडिशनल चीफ प्रोजेक्ट मनेजर (टेलिकॉम) आशिषकुमार त्रिभुवन संधी यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.दहशतवादी कनेक्शन?पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मेट्रो रेल्वेची आॅनलाईन हॅक करून विदेशात अनेक कॉल केले. त्यामुळे संबंधित गुन्हेगारांचे पाकिस्तान अथवा अशाच कोणत्या शत्रू राष्ट्र किंवा त्या राष्ट्रातील दहशतवादी संघटनांसोबत कनेक्शन आहे का, असा धडकी भरविणारा प्रश्न निर्माण झाला आहे. या संबंधाने संबंधित अधिकारी चौकशी करीत आहेत.
महामेट्रोची टेलिफोन लाइन हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 5:40 AM