लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - घरकाम करणाऱ्या महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने एका डॉक्टरकडे १२ दिवसात दोन वेळा चोरी केली. रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण अडीच ते तीन लाखांचा ऐवज लंपास केला. दुसऱ्या वेळी मोठा हात मारल्याने डॉक्टर पोलिसांकडे पोहचले आणि सोमवारी या घटनेचा खुलास झाला.
संजयकुमार ब्रजोबंधू बारिक (वय ३६) हे नरेंद्रनगरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ राहतात. त्यांच्याकडे घरकामासाठी एक महिला होती. डॉक्टर फारसे लक्ष देत नसल्याने तिने आपल्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने ४ जुलैला डॉक्टरच्या घरातून ९ हजारांची रक्कम चोरली. डॉक्टरच्या ते लक्षातच आले नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा १७ जुलैला तिने २५ ते ३० हजार आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. डॉक्टरांनी तिला विचारणा केली असता तिने कानावर हात ठेवले. त्यामुळे डॉक्टर सरळ बेलतरोडी ठाण्यात पोहचले. ठाणेदार विजय आकोत यांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विकास मनपिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तपास कामात लावले.
----
सीसीटीव्हीमुळे पोलखोल
घरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर घरकाम करणाऱ्या महिलेचे चाैर्यकर्म उघड झाले. महिलेला याबाबत पोलीस ठाण्यात आणून विचारणा केली असता तिने अनभिज्ञता दर्शवित चोरीचा इन्कार केला. तिला सीसीटीव्ही फुटेज दाखविले असता तिची बोलती बंद झाली. तिने चोरीची कबुली देऊन चोरीचे सोने सराफाकडे विकल्याचे सांगितले. सराफाने ते गाळून त्याची लगड तयार केली होती. ती ६५ ग्राम वजनाची कांबी, रोख १५ हजार आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
----
कारागृहात रवानगी
चोरीच्या गुन्ह्यात स्वत:सह अल्पवयीन मुलीलाही अडकविणाऱ्या महिलेला पोलिसांनी न्यायालयात हजर करून तिची कोठडीत रवानगी केली. मुलीला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस उपायुक्त डॉ. अंकूश शिंदे, सहायक आयुक्त नीलेश पालवे, ठाणेदार विजय आकोत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास मनपिया, हवालदार शैलेश बडोदेकर, तेजराम देवळे, अविनाश ठाकरे, रणधीर दीक्षित, मिलिंद पटले, नायक प्रशांत सोनुलकर, कमलेश गणेर, बजरंग जुनघरे, शिपायी कुणाल लांडगे, वंदना लोटे, मीना यादव, अश्विनी टेंभरे, शीतल आणि अमिता यांनी ही कामगिरी बजावली.
---