गुन्हे शाखेने पकडले : सोमवारी न्यायालयात हजर करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुचर्चित मनीष श्रीवास हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि गॅंगस्टर रणजीत सफेलकरचा साथीदार छोटू बागडे याला गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनात युनिट तीनच्या पथकाने रविवारी नाट्यमयरीत्या अटक केली.
गेल्या सहा महिन्यांपासून तो फरार होता. गँगस्टर रणजीत सफेलकर टोळीतील मुख्य गगुंडापैकी एक असलेला छोटू बागडे, इशाक मस्ते आणि मनीष श्रीवास हे तिघे खास मित्र होते. मात्र, टोळीप्रमुख सफेलकर याला मनीषपासून धोका निर्माण झाल्यामुळे सफेलकरने मनीषच्या हत्याकांडाचा कट रचला. त्याला बाई बाटलीचे वेड असल्यामुळे घरून शेतात आणण्याची जबाबदारी छोटू बागडेवर सोपविली. त्यानुसार, बागडे घटनेच्या रात्री मनीषच्या घरी गेला. ‘मस्त माल आणला आहे,’ असे सांगून छोटूने मनीषला सेंट्रो कारमध्ये बसवले. नंतर ते पवनगावच्या एका फार्महाउसवर गेले. तेथे आधीच कट कारस्थान रचणारा रणजीत सफेलकर, कालू हाटे, भारत हाटे, सिनू अण्णा, इशाक मस्ते, हेमंत गोरखा, विनय बाथो आधी हजर होते. कारमधून उतरताच, या सर्वांनी छोटूवर शस्त्राचे सपासप घालून त्याची हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून एका पोत्यात भरून ते दरीत फेकले. २०१२ मध्ये हे हत्याकांड घडले. गुन्हेगारी वर्तुळात त्याची सर्वांना माहिती होती. मात्र, पोलिसांना कुणीही याबाबत सुगावा लागू दिला नाही. दरम्यान, २०१६ला एकनाथ निमगडे हत्याकांड घडले. त्याचा तपास सीबीआयकडे होता. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील अनडिटेक्ट मर्डरच्या फाइल तपासल्या. त्यातून रजीत सफेलकर यांनी पाच कोटीची सुपारी घेऊन निमगडेची हत्या केल्याचे उघड झाले. त्या हत्याकांडाचा तपास करतानाच मनीषचीही हत्या सफेलकर टोळीने केल्याचे उघड झाले.
--
वाळू तस्कराच्या संपर्कात होता
पोलिसांनी आतापर्यंत या हत्याकांडात सात जणांना अटक केली. छोटू बागडे मात्र फरार होता. रविवारी पहाटे खापरखेडा येथील एका वाळूतस्कराच्या तो संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यावर, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी युनिट तीनच्या पथकाला कामी लावले. या पथकाने बागडेच्या मुसक्या बांधल्या. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करून, पीसीआरची मागणी केली जाणार आहे.
---