६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन : मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, राधामोहन सिंग, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद प्रमुख अतिथी नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गुरुवार ६ तारखेपासून सोहळ्याला सुरुवात होत असून मुख्य सोहळा हा अशोक विजयादशमीच्या दिवशी ११ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत यासंबंधी सविस्तर माहिती देताना सांगितले, स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या यंदाच्या मुख्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कर्नाटकचे समाजकल्याण मंत्री एच. अंजय्या, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके उपस्थित राहतील. याशिवाय देशविदेशातील बौद्ध भदंत व विचारवंत देखील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पत्रपरिषदेत स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सदस्य विजय चिकाटे, एल.आर. सुटे, विजय गजघाटे, आ. डॉ. मिलिंद माने, डॉ. सुधीर फुलझेले, प्रा. प्रकाश खरात, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. गौतम कांबळे, कैलास वारके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)गेल्या वर्षी ४७.५० लाख रुपये दान दीक्षाभूमीवर येणारे लाखो अनुयायी स्मारक समितीच्या कामाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने दान करतात. गेल्या वर्षीपासून मिळालेले दान जाहीर करण्याची पद्धत स्मारक समितीने सुरू केली आहे. मार्च २०१५ ते मार्च २०१६ या दरम्यान दीक्षाभूमीतील दान पेटीमध्ये एकूण ४७ लाख ५० हजार रुपयाचे दान अनुयायांनी जमा केले. ते स्मारक समितीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. स्मारक समितीचे सदस्य डॉ. सुधीर फुलझेले यांनी ही माहिती दिली. हा सर्व निधी धम्मदीक्षा सोहळ्यासाठी वापरला जातो. सोहळ्यासाठी किमान ६० ते ७० लाखाचा खर्च येतो. हा खर्च समिती स्वत:तर्फे करते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा ११ ला
By admin | Published: October 05, 2016 3:20 AM