मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री गडकरी, राधामोहन सिंग प्रमुख अतिथीनागपूर : ५९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर पूरमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा २२ आॅक्टोबर रोजी होईल. यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, कर्नाटकचे सामाजिक कल्याण व मागासवर्ग कल्याण मंत्री एच. अंजय्या, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री राजकुमार बडोले, माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, महापौर प्रवीण दटके प्रमुख पाहुणे राहतील. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी यासंदर्भात शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरवर्षी दीक्षाभूमीवर देशविदेशातील बौद्ध आंबेडकरी अनुयायांची संख्या वाढत आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासंबंधी व्यवस्था करण्यासाठी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, राज्य विद्युत मंडळ, स्पॅन्को, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग आणि पोलीस विभागासह संपूर्ण यंत्रणा महिनाभरापासून कामाला लागली आहे. या सर्वांच्या सहकार्याने यंदाचाही सोहळाही यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, सदस्य एन.आर. सुटे, विलास गजघाटे, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य पी. सी. पवार, एस.के. गजभिये, कैलास वारके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सोमवारी महिला परिषद धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित सोहळ्याला सोमवार १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता महिला परिषदेने सुरुवात होईल. कमलताई गवई यांच्या अध्यक्षतेत ही परिषद होईल. त्यानंतर २० आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपासून धम्मदीक्षा सोहळ्यास सुरुवात होईल. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्यातर्फे बौद्ध धम्माची दीक्षा दिली जाईल. २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता विलास गजघाटे यांच्या हस्ते आणि विजय चिकाटे यांच्या अध्यक्षतेखाली पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण होईल. बुधवारी जागतिक धम्मपरिषद भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, २१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जागतिक धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदानंद फुलझेले यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. परिषदेला थायलंड, जपान, कम्बोडिया, श्रीलंका, लाओस इत्यादी देशातील बौद्ध भिक्खू आणि बौद्ध नेते मार्गदर्शन करतील. थायलंडमधील ३८ बौद्ध विद्वान राहणार उपस्थित धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर थायलंड येथून तब्बल ३८ बौद्ध विद्वान उपस्थित राहणार आहेत. मुख्य सोहळ्यासह ते विविध कार्यक्रमांमध्येही सहभागी होतील. सर्व विहारात एकाचवेळी वंदना घ्यावी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर सकाळी ९ वाजता पूज्य महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून यावर्षी देखील २२ आॅक्टोबरला सकाळी ९ वाजता दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात येईल. याचवेळी शहरातील सर्व विहारांत बुद्ध वंदना घेण्यात यावी, अशी जाहीर विनंती स्मारक समितीतर्फे बौद्ध जनतेला करण्यात आली.टीव्ही वाहिन्यांवरून थेट प्रसारण दीक्षाभूमीवरील मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रसारण सायंकाळी ५ वाजेपासून दूरदर्शनसह लॉर्ड बुद्धा, आवाज इंडिया आणि युसीएन या वाहिनीवरून करण्यात येईल. सोमवारी पालकमंत्री घेणार आढावा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या व्यवस्थेसंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सोमवारी दुपारी ३ वाजता दीक्षाभूमीवर सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी महापौरांनी दोन वेळा प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. विभागीय आयुक्त अनुपकुमार आणि जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सुद्धा बैठक घेऊन दिशानिर्देश जारी केले आहेत.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा गुरुवारी
By admin | Published: October 18, 2015 3:21 AM