लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अगोदरच कोरोनाचा प्रकोप झेलणाऱ्या नागपूरकरांची शहरात फिरणाऱ्या बिबट्याने झोप उडवली आहे. मात्र, दहशतीच्या काळातदेखील नागपूरकरांनी ‘हम किसी से डरते नहीं’ हे स्पिरिट जपले आहे. बिबट्यावरून सोशल मीडियावर हलक्याफुलक्या विनोदांना उधाण आले असून, विविध मिम्सदेखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे बिबट्याची चर्चा आणखी खमंगपणे होत असून, त्या निमित्ताने कोरोनाच्या अगोदरच्या काळातील आठवणीदेखील ताज्या झाल्या आहेत.
काही दिवसांअगोदर आयटी पार्क परिसरात बिबट्या दिसला होता. त्यानंतर महाराजबाग, विभागीय आयुक्त कार्यालय इत्यादी ठिकाणीदेखील तो दिसल्याचे दावे करण्यात आले. बिबट्या ज्या ज्या भागात गेला त्याच्याशी निगडित विविध मिम्स तयार करण्यात आले. प्रामुख्याने संबंधित भागाची ओळख, खाद्यसंस्कृती याच्याशी बिबट्याला जोडण्यात आले. विविध सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सवर हे मिम्स शेअर होत आहेत. पाहूयात नेमके काय आहेत हे मिम्स.
जॉब शोधायला आयटी पार्कमध्ये
आयटी पार्क परिसरात विविध कंपन्या आहेत. बिबट्या येथे दिसल्यानंतर तो जणू येथे जॉबच मागायला आला आहे, या आशयाचे मिम्स तयार करण्यात आले.
भाऊ आधार कार्डची एक झेरॉक्स देजो गा
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात विविध प्रशासकीय कामे होतात व तेथे अनेक झेरॉक्सची दुकानेदेखील आहेत. या अनुषंगाने बिबट दुकानासमोर उभा राहून झेरॉक्स मागत असल्याचे मिम व्हायरल होत आहे.
बादशाह, एक प्लेट पाटोडी लगा
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पाटोडी प्रसिद्ध आहे. यालाच घेऊन नागपूरकरांनी भन्नाट मिम्स तयार केले आहेत. बिबट चक्क एका दुकानासमोर उभा राहून एक प्लेट पाटोडी मागत आहे, असे यात दर्शविण्यात आले आहे.
तू टेन्शन नको घेऊ भाऊ
दक्षिण-पश्चिम नागपुरातील अनेक रस्त्यांवर भटकी कुत्री मोठ्या संख्येत असतात. ही कुत्री दहशतीत असून, तू टेन्शन नको घेऊ, आपण दोघे सोबत जाऊ, असे मिम्सदेखील व्हायरल होत आहे.