अपहरण-हत्या प्रकरण : आरोप निश्चित होण्याची प्रकिया लांबणीवरनागपूर : लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय युग चांडक अपहरण-हत्याप्रकरणी मंगळवारी मुख्य आरोपीच्या वकिलाने खटला लढण्याचे अधिकारपत्र परत घेतल्याने, आज होणारी आरोप निश्चितीची प्रक्रिया लांबणीवर पडली. मुख्य आरोपी राजेश धनालाल दवारे (१९) रा. वांजरी ले-आऊट कळमना याचे वकीलपत्र अॅड. अशोक भांगडे यांनी घेतले होते. लकडगंज पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर ते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले होते. आज आरोप निश्चित होणार होते. परंतु अचानक भांगडे यांनी खटला लढण्याचे अधिकारपत्र परत घेतल्याने न्यायालयापुढे नवा पेच निर्माण झाला. न्यायालयाने ज्या निष्णात वकिलांना आरोपी राजेश दवारे याचा खटला लढण्यासाठी विचारणा केली, त्यांनी चक्क नकार दिलेला आहे. न्यायालयाने वकील नेमण्यासाठी २३ डिसेंबरपर्यंत आरोपी राजेशला संधी दिली आहे. मुदतीत तो वकील नेमण्यास अपयशी ठरल्यास ‘लीगल एड’मार्फत शासनाच्या खर्चाने वकील नेमण्याची कायद्यात तरतूद आहे. या प्रकरणात राजेश दवारे, त्याचा मित्र अरविंद अभिलाष सिंग (२३) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका आणि विधी संघर्षग्रस्त बालक, असे तीन आरोपी आहेत. विधी संघर्षग्रस्त बालकाविरुद्ध बाल न्यायालयात खटला चालणार आहे. गुन्ह्याच्या कटात सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ‘मम्मी हास्पिटल में बुला रही है’, अशी थाप मारून युग याचे स्कूटीने अपहरण करण्यात आले होते. युग हा सेंटर पॉर्इंट शाळेचा दुसऱ्या इयत्तेचा विद्यार्थी होता. त्याचे वडील डॉ. मुकेश चांडक दंत तज्ज्ञ असून त्यांचे दोसरभवन चौकात क्लिनिक आहे. अपहरणाच्या दिवशीच दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात निष्पाप, निरागस युगचा खून करण्यात आला होता. मुख्य आरोपी राजेश याने २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता कबुली देऊन मृतदेह काढून दिला होता. मृतदेह रेतीने झाकलेला होता आणि डोक्यावर मोठा दगड ठेवलेला होता. (प्रतिनिधी)गुदमरून मृत्यूयुगचा मृत्यू गुदमरून झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्याचा अभिप्राय शवविच्छेदन अहवालात आहे. त्याच्या संपूर्ण शरीरावर २६ जखमा होत्या. आरोपींकडून खंडणीसाठी दोनवेळा फोन करण्यात आले होते. पहिला फोन १ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ८.१७ वाजता डॉ. मुकेश चांडक यांना करण्यात आला होता. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव मोहसीन खान असल्याचे सांगितले होते. त्याने १० कोटी रुपयाची मागणी केली होती. लागलीच रात्री ८.३८ वाजता दुसरा फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव सांगितले नव्हते. ‘युग हमारे कब्जे मे है, ५ करोड लेकर आओ, कल शाम ३ बजे बंबई मे पैसे लेकर आना’, असेही त्याने म्हटले होते. या प्रकरणी आरोपींची ओळखपरेड घेण्यात आलेली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर प्राप्त करण्यात आलेला आहे. १०० साक्षीदारया खटल्यात १०० जणांना साक्षीदार करण्यात आले असून, २९० पानांचे आरोपपत्र आहे. पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल हे तपास अधिकारी आहेत. सरकार पक्षाच्या वकील ज्योती वजानी आहेत. तर दुसरा आरोपी अरविंद सिंग याचे वकील अॅड. मनमोहन उपाध्याय आणि अॅड. प्रमोद उपाध्याय आहेत. आज दोन्ही आरोपी न्यायालयात हजर होते.
मुख्य आरोपीच्या वकिलाची माघार
By admin | Published: December 17, 2014 12:30 AM