लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शरिराची निगा न राखल्यास मनुष्य आजारी पडतो त्याचप्रमाणे बांधकामातील त्रुटी वेळीच दूर न केल्यास ते तकलादू होते. त्यामुळे बांधकामांच्या आजारांचेही वेळीच निदान करून त्याची दुरुस्ती केल्यास ते अधिक सक्षम करता येऊ शकते. त्यातून त्याची उपयोगिताही वाढविता येते. यासाठी शासकीय अभियंत्यांनी अत्याधुनिक यंत्रणांचा उपयोग करावा आणि बांधकामांचे आरोग्यही सांभाळावे, असे प्रतिपादन बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मुंबई येथील स्ट्रक्टवेल कन्स्ट्रक्शन कंपनीचे चेअरमन चेतन रायकर यांनी येथे केले.देशातील रस्ते, पूल, इमारती, धरणे आदी बांधकामे अधिक सक्षम कसे करता येतील, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिंचन विभागाला अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र अभियंत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिकतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिंचन विभागातील अभियंत्यांसाठी रविभवन येथे दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी या कार्यशाळेला सुरुवात झाली.पहिल्या दिवशी चेतन रायकर यांनी ‘स्ट्रक्चरिंग हेल्थ मॉनिटरिंग अॅण्ड मेंटनन्स’- बिल्डिंग अॅण्ड ब्रिजेस’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मानवाप्रमाणेच बांधकामांनाही विविध आजार होऊ शकतात. त्यामुळे बांधकामांना तडे जाणे, कॉलममध्ये खड्डा पडणे, पाणी झिरपणे आदी अनेक लक्षणे असतात. यांची वेळीच दुरुस्ती न झाल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवहानीसुद्धा झालेली आहे. हे रोखण्यासाठी बांधकाम करतानाच त्यात दोष राहू नये, याची काळजी घ्यावी लागते. परंतु बांधकाम झाल्यावरसुद्धा त्यात काही दोष राहिलेत का. राहिले असतील तर ते कसे ओळखता येईल. यासाठी काँक्रिट न तोडता त्याची त्याच ठिकाणी टेस्टिंग घेऊन त्याची क्षमता कशी तपासावी. यातून जे निदान होईल, त्या आधारे ते दुरुस्त करून संबंधित बांधकाम अधिक सक्षम कसे करावे, याच्या विविध तपासणीच्या पद्धती त्यांनी यावेळी अभियंत्यांना समजावून सांगितल्या. तपासण्याच्या विविध पद्धती आहेत. परंतु शासकीय कार्यालयांमध्ये अजूनही केवळ क्यूब टेस्टच केली जाते. यापुढेही विविध टेस्ट (तपासण्या) करण्याची आवश्यकता आहे. अल्ट्रासोनिक हे सोनोग्राफीची पद्धत आहे. लिंग निदान किंवा इतर आजारासाठी वापरण्यात येणारी ही पद्धत बांधकामांच्या तपासणीसाठी सुद्धा वापरली जाते. बिल्डिंगपासून तर ब्रिजेसपर्यंत ही पद्धत वापरली जाते. परंतु या तपासणीसोबतच बांधकामातील कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन्थचीही तपासणी आवश्यक आहे. दोन्ही सोबत केल्यानेच योग्य निदान होऊ शकते. यासोबतच स्मीत हॅमर, कोरिंग, मॅग्नोटोमीटर या शास्त्रशुद्ध तपासणीच्या पद्धतींचीही त्यांनी यावेळी माहिती दिली. तसेच याचे प्रात्यक्षिकही दाखविले. या कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूरचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रबोधिनीचे अधीक्षक अभियंता विकास रायगुडे, अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे, अधीक्षक अभियंता (वाशिम) नसीम अंसारी, कार्यकारी अभियंता सतीश आंभारे प्रामुख्याने उपस्थित होते.रेग्युलर आॅडिट झालेच पाहिजेशासकीय इमारती, रस्ते, पूल, धरणे आदी बांधकामांचे रेग्युलर आॅडिट हे झालेच पाहिजे परंतु तसे होत नाही. ते झाले असते तर सरस्वती नदीवरचा पूल हा कदाचित वाचवता आला असता, असेही रायकर यांनी सांगितले.मंदिर १०० वर्षे टिकतात, पूल का टिकू नयेत?१०० वर्षांपूर्वी बांधलेली मंदिरे आजही टिकून आहेत. ती मंदिर इतकी वर्षे टिकू शकतात तर मग आपण बांधलेले पूल, रस्ते का टिकू नयेत, असा प्रश्न उपस्थित करीत सध्या प्रचंड जड वाहने वाहून नेणारी वाहने आली आहेत. त्या वाहनांचा भार वाहू शकतीत, असे सक्षम रस्ते निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचेही रायकर यांनी सांगितले.
बांधकामांचेही आरोग्य सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:30 AM
शरिराची निगा न राखल्यास मनुष्य आजारी पडतो त्याचप्रमाणे बांधकामातील त्रुटी वेळीच दूर न केल्यास ते तकलादू होते.
ठळक मुद्देचेतन रायकर : महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रबोधिनीची कार्यशाळा