नागपूर : संपूर्ण देश ‘आत्मनिर्भर भारत’साठी विविध मार्गाने प्रयत्न करत आहे. या मोहिमेत भारतीय वायुदलाच्या मेन्टेनन्स कमांड युनिटचे मौलिक योगदान असल्याचे मत हवाईदलप्रमुख प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी व्यक्त केले. वायुसेना नगर येथील मेन्टेनन्स कमांडमध्ये २७ व १८ एप्रिल रोजी देशातील विविध युनिट्समधील कमांडर्सच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेदरम्यान ते अध्यक्षस्थानी उपस्थित होते व त्यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्र उभारणीच्या दिशेने सुरू झालेल्या बदलांमध्ये सर्व जवानांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व युनिट आपापल्या परीने पूर्ण प्रयत्न करत असून भविष्यात याला आणखी वेग मिळेल असा विश्वास हवाईदलप्रमुखांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी फ्लीट आणि यंत्रणांच्या देखभालीमध्ये मेन्टेनन्स कमांड मुख्यालय आणि त्यांच्या युनिट्सच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले. यावेळी त्यांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट ठरलेल्या युनिट्सना पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आले. नागपूर मेन्टेनन्स कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल विभास पांडे यांनी हवाईदलप्रमुखांचे स्वागत केले.