लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : परिसरातील शिवारात रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. नरखेड येथील शेतकरी तुकाराम रेवतकर यांच्या ब्राह्मणी व नरखेड शिवारातील साडेचार एकरातील कापणीला आलेले मका पीक रानडुकरांच्या कळपाने पूर्णत: उद्ध्वस्त केले. हाताताेंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकऱ्यावर माेठे आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रयाेगशील शेतकरी तुकाराम रेवतकर यांची नरखेड व लगतच्या ब्राह्मणी शिवारात शेती असून, त्यापैकी साडेचार एकर क्षेत्रात त्यांनी ८ जूनला मक्याची पेरणी केली. यापूर्वी ते साेयाबीनचे पीक घेत हाेते. परंतु राेही (नीलगाय) व इतर वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून मक्याचे पीक घेणे सुरू केले. मका पिकाकरिता एकरी उत्पादन खर्च १५ हजार रुपये येतो. एकरी उत्पादन २० क्विंटल असून, मक्याला हमीभाव १,९२० रुपये भाव आहे. हे पीक ९० ते १०० दिवसात कापणीला येते. पावसाळ्यात मक्याच्या कणसाला मोठी मागणी असते म्हणून एक आठवड्याने काही प्रमाणात कापणी करण्याच्या विचारात असतानाच ९ ते १६ ऑगस्टदरम्यान ४०-५० रानडुकरांच्या कळपाने संपूर्ण पीकच उद्ध्वस्त केले. दरवर्षी ४-५ क्विंटलचे नुकसान व्हायचे. परंतु या हंगामात संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्यामुळे रेवतकर कुटुंबीयांवर अस्मानी संकट ओढवले आहे.
नरखेड व लगतच्या शिवारातील शेतकऱ्यांना रोही (नीलगाय) व रानडुकरांच्या उपद्रवाला सामाेरे जावे लागत आहे. वन्यप्राणी कळपाने धुडगूस घालून पिके नष्ट करतात. रानडुकरांच्या या उपद्रवामुळे उत्पन्न तर सोडाच पण नुकसान अधिक हाेत असल्यामुळे नरखेड, नवेगाव, ब्राह्मणी, पळसगाव शिवारात शेकडो एकर जमीन पडिक आहे. त्यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदाेबस्त करण्याची मागणी आहे.