लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : रासायनिक खताच्या वापरातून उत्पादित भाजीपाला बाजारात मिळतो. त्याचे भावही अव्वाच्यासव्वा असतात. अशात स्तनदा माता, गर्भवती महिला, लहान मुलामुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी कमी खर्चात पोषक असा सकस आहार मिळावा. शिवाय, सेंद्रिय पध्दतीने उत्पादित फळभाज्या, पालेभाज्या व औषधी वनस्पती त्यांच्याच गावात दररोज उपलब्ध व्हाव्यात यासाठी उमेद अभियानामार्फत ‘माझी पोषण परसबाग’ या मोहिमेचा प्रारंभ तालुक्यातील कोलारी येथे परसबागेच्या निर्मितीतून करण्यात आला.
‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कृतिसंगमअंतर्गत १५ जून ते १५ जुलै या कालावधीत माझी पोषण परसबाग विकसन मोहीम उपक्रम तालुक्यात राबविला जात आहे. अभियानातील सहावे सूत्र ‘आरोग्याची नियमित काळजी घेणे’ याला अनुसरून अन्न, पोषण व स्वच्छता अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे सुदृढ आरोग्य व पोषणाचा स्तर वाढविणे, भाजीपाला खरेदीचा खर्च कमी करणे, गर्भवती महिला, स्तनदा मातांसह किशोरवयीन व लहान मुलामुलींना आहारातून सकस पोषकद्रव्ये मिळावे. यासाठी ग्रामीण भागात महिलांनी पुढाकार घेऊन परसबाग निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. या परसबागेतून सेंद्रिय पध्दतीने पिकविलेल्या वेगवेगळ्या ताज्या फळ, पालेभाज्या व औषध वनस्पती दररोज उपलब्ध हाेणार आहे, अशी माहिती अभियानाचे व्यवस्थापक रवींद्र शेंडे यांनी दिली. खंडविकास अधिकारी माणिक हिमाने, जिल्हा व्यवस्थापक (उपजीविका) सोनाली पटोले, सहायक खंडविकास अधिकारी रोशनकुमार दुबे यांचे यासाठी मार्गदर्शन मिळत आहे.
परसबाग निर्मितीसाठी उमेद अभियानातील आयसीआरपी, वर्धिनी, एलसीआरपी, कृषिसखी, पशुसखी, बँक सखी, बीसीसखी, एफएलसीआरपी या कॅडर्सचे महत्त्वाचे योगदान राहणार आहे. तालुक्यातील कोलारी येथे पहिल्या माझी पोषण परसबागेची निर्मिती करून मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी तालुका व्यवस्थापक रवींद्र शेंडे, आरती तिमांडे, चिरंजीत बुरांडे, कृषिसखी गीता भोयर व समूहाच्या महिला उपस्थित होत्या.
....
७५० परसबागेची निर्मिती
उमेद अभियानामार्फत तालुक्यात ७५० वर परसबागेची निर्मिती करण्याचा संकल्प केला आहे. तालुक्यात ५६ ग्रामपंचायती असून १२५ वर कॅडर्स आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत १० ते १५ परसबागा तयार करून ७५० परसबागांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी उमेदची तालुकास्तरीय चमू प्रयत्न करीत आहे.
....
पोषण परसबाग विकसन मोहिमेदरम्यान बचतगटातील महिलांकरिता वैयक्तिक व सामूहिक पोषण परसबाग विकसित करण्याचे नियोजन असून, गाव तिथे पोषण परसबाग विकसित करण्यात येईल. या परसबागांच्या माध्यमातून उत्तम आहार आणि सुदृढ आरोग्य मिळणार आहे.
- माणिक हिमाणे, खंडविकास अधिकारी, भिवापूर.
===Photopath===
200621\img-20210620-wa0022.jpg
===Caption===
तालुक्यातील कोलारी येथे निर्मीत 'माझी पोषण परसबाग' व उमेदची टिम