योगेश पांडे
नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गणवेशानंतर आता आणखी एक मोठा बदल होण्याच्या मार्गावर आहे. संघप्रणालीत प्रशिक्षण वर्गांना खूप महत्त्व आहे. स्वयंसेवक व प्रचारक घडविणाऱ्या या वर्गांच्या प्रणालीत पूर्णत: बदल करण्यात येणार असून, अभ्यासक्रमदेखील बदलण्यात येणार आहे. विशेष म्हणजे काळाची गरज लक्षात घेता व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण सत्रांचा समावेश करण्यात येणार आहे. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाची बैठक रविवारपासून गुजरातमधील भूज येथे सुरू होत आहे. त्यात याच्या आराखड्यावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीत दैनंदिन शाखा आणि प्रशिक्षण वर्गांचे मोठे महत्त्व आहे. आतापर्यंत संघ शिक्षा वर्गांमधून लाखो स्वयंसेवक प्रशिक्षित होऊन बाहेर पडले आहेत. संघात प्राथमिक, प्रथम, द्वितीय व तृतीय असे वर्ग दरवर्षी आयोजित करण्यात येतात. साधारणत: उन्हाळ्याच्या सुट्यांच्या काळात हे वर्ग आयोजित केले जातात. या वर्गांच्या प्रणालीत याअगोदरही मोठे बदल झाले आहेत. मात्र, आता तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे संघातील विविध विभागांमधील प्रशिक्षणामध्ये त्यादृष्टीने नवीन मुद्दे व विषयांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यानुसार सत्र व व्यावहारिक प्रशिक्षण निश्चित करण्यात येतील. यासोबतच या वर्गांचा कालावधी कमी करण्याबाबत विचार सुरू आहे. यावर भूज येथील बैठकीत सखोल मंथन होऊन त्याला अंतिम स्वरुप देण्यात येईल. २०२४पासून या बदलाची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बैठकीत अभ्यासक्रमाचे ठरणार अंतिम स्वरुप
दरवर्षी होणारे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षाचे प्रशिक्षण वर्ग आमच्यासाठी फार महत्त्वाचे असतात. त्यात दिलेले प्रशिक्षण अभ्यासक्रम वेळोवेळी बदलत राहतात. मागील काही काळापासून अभ्यासक्रमात बदल करण्याबाबत चर्चा होती. त्यावर अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत मंथन करण्यात येईल, असे संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले.
प्रशिक्षणासाठी विशेष अभ्यासक्रम
संघ शिक्षा वर्गांसाठी विशेष अभ्यासक्रम तयार करण्याची परंपरा आहे. सुरुवातीच्या काळात शारीरिक उपक्रमांवर जास्त भर असायचा. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक जीवन, ग्रामविकास, कृषी, प्रचार, प्रसारमाध्यमे या विषयांबाबतही प्रशिक्षण देण्यात येते. आता यात आणखी बदल करण्यात येणार असून, त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.
१९२७ साली झाली प्रशिक्षण वर्गाची सुरुवात
अवघ्या १७ शिक्षार्थ्यांपासून संघाच्या तृतीय वर्ष वर्गाची सुरुवात झाली होती. संघाचा सर्वात पहिला वर्ग १९२७ साली मोहितेवाडा येथे आयोजित करण्यात आला होता. आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या वर्गाला ‘ओटीसी’ (ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्प) या नावाने संबोधण्यात येत होते. सुरुवातीला हा वर्ग ४० दिवसांचा असायचा. या वर्गात सैन्याप्रमाणे प्रशिक्षण दिले जायचे. सकाळी ४ तास शारीरिक व दुपारी बौद्धिक उपक्रम व्हायचे. १९५०नंतर ‘ओटीसी’ला संघ शिक्षा वर्ग असे नाव पडले. भारतभर विविध प्रांतस्तरांवर प्राथमिक, प्रथम व द्वितीय वर्गांचे आयोजन होते. परंतु, तृतीय वर्ष वर्गाचे आयोजन हे केवळ नागपूर येथील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातच होते. ४० दिवसांचा तृतीय वर्ष वर्ग ३० दिवसांचा झाला व २०१३ सालापासून याचा कालावधी २५ दिवसांचा झाला.