नागपूर : नागपूर, अमरावतीसह राज्यात चार ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीत बसलेला फटका, त्यापाठोपाठ कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेला पराभव याचा धसका घेत भाजपने राज्य कार्यकारणीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बहुतांश जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे तर प्रदेश पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यातीलही अनेकांना पदमुक्त केले जाण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार मार्चच्या अखेरीस गुढी पाडव्यानंतर हे फेरबदल केले जातील.
आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहा महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली होती. मात्र, त्यांनी जुन्याच कार्यकारणीला सोबत घेत काम सुरू ठेवले. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर झालेल्या विधान परिषद व विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून जिल्हा व शहर अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. यात काही पदाधिकाऱ्यांचे काम समाधानकारक नसल्याचे किंवा स्थानिक पातळीवर बदल आवश्यक असल्याचे पुढे आले आहे. याची दखल घेत मार्च अखेरीच फेरबदल केले जाणार आहेत.
लोकसभा, विधानसभेची नव्या दमाची टीम
- भाजपने लोकसभेसाठी ‘मिशन ४५’ तर व विधानसभेसाठी ‘मिशन २००’ निश्चित केले आहे. आगामी काळात महिपालिकेच्या रखडलेल्या निवडणुकादेखील होतील. या सर्व निवडणुकांसाठी नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांची टीम तयार करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष निवडणुकीपूर्वी एकत्र आले तर त्यांना टक्कर देण्यासाठी आतापासूनच पक्षातील चांगले काम करणाऱ्यांना हेरून जबाबदारी सोपविण्याचा भाजपचा प्लान आहे.
सहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभर दौरे केले. पुन्हा काही भागांचे दौरे केले जातील. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची सक्षम टीम उभारायची आहे. गरजेच्या ठिकाणी नवे जिल्हाध्यक्ष नेमले जातील. काही प्रदेश पदाधिकारी बदलले जातील. योग्य नेत्याला योग्य काम दिले जाईल.
- आ. चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप