नरेश डोंगरे - विशाल महाकाळकर
नागपूर - मोर्चे, आंदोलनं, सभा-संमेलनात महिला पुढेच असतात. किंबहुना मोठ्या संख्येत महिलांनी त्यात सहभागी व्हावे, असा खास आग्रह नेत्यांकडून धरला जातो. मात्र, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आल्या की महिलांना खासदार, आमदारकीची उमेदवारी देण्यात नेत्यांना स्वारस्य नसते. यावेळी महिलांना पद्धतशीर बाजूला सारले जाते. नागपुरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांची ही स्ट्रॅटेजी आहे. ती लक्षात आल्याने आता विविध राजकीय पक्षातील महिला नेत्यांनी कंबरेला पदर खोचण्याची तयारी चालवली आहे. यावेळी किमान विधानसभेची उमेदवारी मिळालीच पाहिजे, असा पवित्रा घेण्याच्या मानसिकतेत सर्वच पक्षातील महिला नेत्या असल्याचे त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर लक्षात आले आहे.
राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचे स्तोम माजले आहे. निवडणुका डोळ्यांसमोर असल्याने आम्हीच कसे ओबीसी समाजाचे पालनहार, असा आविर्भाव आणून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आरडाओरड करून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. हे करतानाच प्रत्येक वेळी महिला सक्षमीकरणाच्या बाता करणाऱ्या नागपूर-विदर्भातील नेत्यांनी महिलांना आमदार बनविण्याच्या मुद्द्यांकडे साळसूदपणे दुर्लक्ष केले आहे. एकापेक्षा एक चांगल्या महिला नेत्या पक्षात असताना लोकसभेची उमेदवारी सोडा, विधानसभेच्या २००९, २०१४ आणि २०१९ या तीन निवडणुकांच्या वेळी कोणत्याच प्रमुख राजकीय पक्षाने एकाही महिलेला आमदारकीची उमेदवारी दिलेली नाही. हा मुद्दा सर्वच राजकीय पक्षातील महिला नेत्या-कार्यकर्त्यांमध्ये खदखद निर्माण करून गेला आहे. निवडणुकांच्या तोंडावर ही खदखद बाहेर येऊ शकते. महिला नेत्यांच्या या भावना लक्षात घेत ‘लोकमत’ आजपासून ही वृत्तमालिका प्रकाशित करीत आहे.
माजी महापाैर नंदा जिचकार
गेल्या २० वर्षांपासून भाजपमध्ये काम करीत आहे. दोन वेळा नगरसेविका अन् महापाैरपदाची जबाबदारी पार पाडली. याशिवाय पक्षाच्या विविध पदांवर अत्यंत चांगले काम केले. पक्षाच्या सर्वच नेत्यांकडून वेळोवेळी चांगल्या कामाचे तोंडभरून काैतुक झाले. मात्र, गेल्या वेळी पश्चिम नागपूर मतदार संघातून उमेदवारी मागितली तेव्हा निराशा पदरी पडली. यावेळी विधानसभेची उमेदवारी मागणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. महिला आमदार केवळ मुंबई-पुण्यातच होऊ शकतात का, नागपूर-विदर्भातील महिलांमध्ये आमदारकी करण्याची पात्रता नाही का, असा जळजळीत सवालही नंदा जिचकार यांनी व्यक्त केला आहे.
पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघ उमेदवारी
२००९ - कृष्णा खोपडे - भाजपा, सतीश चतुर्वेदी - काँग्रेस
२०१४ - कृष्णा खोपडे - भाजपा, अभिजित वंजारी - काँग्रेस
२०१९ - कृष्णा खोपडे - भाजपा, पुरुषोत्तम हजारे - काँग्रेस
------
पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघ उमेदवारी
२००९ - सुधाकर देशमुख - भाजपा, अनिस अहमद - काँग्रेस
२०१४ - सुधाकर देशमुख - भाजपा, विकास ठाकरे - काँग्रेस
२०१९ - विकास ठाकरे - काँग्रेस - सुधाकर देशमुख - भाजपा
------
मध्य नागपूर विधानसभा मतदार संघ उमेदवारी
२००९ - विकास कुंभारे - भाजपा, नरेंद्र देवगडे - काँग्रेस
२०१४ - विकास कुंभारे - भाजपा, डॉ. अनिस अहमद - काँग्रेस
२०१९ - विकास कुंभारे - भाजपा, बंटी शेळके - काँग्रेस
------
उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघ उमेदवारी
२००९ - डॉ. नितीन राऊत - काँग्रेस, - राजेश तांबे - भाजपा
२०१४ - डॉ. मिलिंद माने - भाजपा, डॉ. नितीन राऊत - काँग्रेस,
२०१९ - डॉ. नितीन राऊत - काँग्रेस - डॉ. मिलिंद माने - भाजपा
------
दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघ उमेदवारी
२००९ - दीनानाथ पडोळे - काँग्रेस, किशोर कुमेरिया (शिवसेना)
२०१४ - सुधाकर कोहळे - भाजपा, सतीश चतुर्वेदी - काँग्रेस
२०१९ - मोहन मते - भाजपा, गिरीश पांडव - काँग्रेस
------
दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघ उमेदवारी
२००९ - देवेंद्र फडणवीस - भाजपा, विकास ठाकरे - काँग्रेस
२०१४ - देवेंद्र फडणवीस - भाजपा, प्रफुल्ल गुडधे - काँग्रेस
२०१९ - देवेंद्र फडणवीस - भाजपा, डॉ. आशिष देशमुख - काँग्रेस
-----