नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाला त्याने खरेदी केलेल्या दोन भूखंडांचे कायदेशीर विक्रीपत्र नोंदवून द्या किंवा वर्तमान सरकारी दराने पैसे परत करा असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने समालोचन एकता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला दिला आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे. ही रक्कम सोसायटीने द्यायची आहे.
अरुण चौधरी असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून ते त्रिमूर्तीनगर येथील रहिवासी आहेत. त्यांची तक्रार आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी निकाली काढली. तक्रारीतील माहितीनुसार, चौधरी यांनी समालोचन सोसायटीच्या मौजा वांजरा येथील ले-आऊटमधील दोन भूखंड १ लाख २० हजार रुपयात खरेदी करण्यासाठी १६ जानेवारी १९९९ रोजी करार केला आहे. त्यावेळी सोसायटीने संपूर्ण रक्कम अदा झाल्यानंतर भूखंडांचे विक्रीपत्र नोंदवून देण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, चौधरी यांनी सोसायटीला संपूर्ण रक्कम अदा केली, पण त्यांना विक्रीपत्र नोंदवून देण्यात आले नाही. त्याऐवजी त्यांना भूखंडाचे कब्जापत्र देण्यात आले. त्यामुळे चौधरी यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यावर आयोगाने सोसायटीला नोटीस बजावली. ती नोटीस तामील होऊनही सोसायटीच्या वतीने कुणीच आयोगासमक्ष हजर झाले नाही. परिणामी, तक्रारीवर एकतर्फी कारवाई करून रेकॉर्डवरील पुराव्यांच्या आधारावर सदर निर्णय देण्यात आला. सोसायटीने चौधरी यांच्याकडून संपूर्ण रक्कम स्वीकारूनही भूखंडांचे विक्रीपत्र करून दिले नाही. सोसायटीने चौधरी यांना त्रुटीपूर्ण सेवा दिली. तसेच, त्यांच्यासोबत अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला असे मत आयोगाने निर्णयात नोंदवले.