नागपूर : उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, स्ट्रोकसह लठ्ठपणा हे असंसर्गजन्य आजार आहेत. अयोग्य जीवनशैलीमुळे या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेषत: मधुमेहींची टक्केवारी भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. २०४५ पर्यंतही संख्या १३४ दशलक्षपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यासह इतरही असंसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी औषधांसोबतच आहारात बदल करण्याची नितांत गरज आहे, अशी माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतर्फे (एम्स) ‘पॅन इंडिया’ने दिली.
‘एम्स’मध्ये शुक्रवारी ‘फिजिशियन असोसिएशन फॉर न्यूट्रिशन इंडिया’ने (पॅन इंडिया) पत्रपरिषदेचे आयोजन केले होते. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. संजना सिक्री, वैद्यकीय संचालक डॉ. रजिना शाहिन, सल्लागार डॉ. आशिष सबरवाल, ‘एम्स’च्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता व ‘एम्स’च्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाठक यांनी ही माहिती दिली. डॉ. सिक्री म्हणाल्या, अयोग्य जीवनशैली व खानापानाच्या चुकीच्या सवयीमुळे उच्च रक्तदाबासोबतच मधुमेह, लठ्ठपणाच नाही तर मानसिक आजारही बळावत आहे. योग्य आहार घेतल्यास हे आजार नियंत्रणात आणून औषधांचा खर्च कमी करणे शक्य आहे.
-‘भरड धान्य’ याकडे पुन्हा वळणे काळाची गरज
डॉ. सबरवाल म्हणाले, जुन्या काळात ‘मिलेट्स’ म्हणजे भरड धान्य हे आपल्या आहाराचा अविभाज्य भाग होता. परंतु मागील काही वर्षांपासून अनेकांना याचा विसर पडला. परिणामी, अयोग्य आहारामुळे लठ्ठपणा व मधुमेहासारखे विकार वाढले आहेत. आता पुन्हा भरड धान्यांचे सेवन करण्याची वेळ आली आहे.
- जीवनशैलीचे आजार गंभीर
डॉ. दत्ता म्हणाल्या, जीवनशैलीचे आजार दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करीत आहे. शासकीय रुग्णालयात या रुग्णांचा भार वाढत आहे. रुग्णांनी औषध व उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आतापासून योग्य आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
-‘लाईफस्टाईल इंटरव्हॅश्नल ओपीडी’
डॉ. पाठक म्हणाल्या, ‘एम्स’च्या फिजीओलॉजी विभागाच्यावतीने ‘लाईफस्टाईल इंटरव्हॅश्नल ओपीडी’ सुरू करण्यात आली आहे. अयोग्य जीवनशैलीचा आजाराचे ३०० ते ४०० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यांचे समुपदेशन करून योग्य आहार व नियमित व्यायामावर भर दिला जात आहे. याचा फायदा ५० ते ६० टक्के रुग्णांना होत आहे. लवकरच या संदर्भातील ‘वेब साईट’ व ‘ॲप’ सुरू करणार आहोत.