लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माैजमजा करण्यासाठी तीन मित्र सराईत चोर बनले. यातील एकाचे नाव रोहित पूनमचंद रुशेश्वरी (वय २०) असून दोघे अल्पवयीन आहेत. नंदनवन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाक्या जप्त केल्या. त्यानंतर त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी उजेडात आली.
खरबीतील सुप्रिया अरुण मिश्रा (वय २०) हिची एव्हिएटर दुचाकी ७ एप्रिलच्या दुपारी जगनाडे चौकाजवळून चोरीला गेली होती. या चोरीचा तपास करताना सोमवारी पोलिसांना रोहित रुशेश्वरी आणि त्याचे दोन साथीदार संशयास्पद अवस्थेत ट्रीपलसीट जाताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या सात दुचाक्यांची कबुली दिली. १ लाख, ९५ हजार किमतीच्या या दुचाक्या त्यांनी पोलिसांच्या हवाली केल्या. तीनही आरोपी एका फर्ममध्ये काम करीत होते. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार गेला. तिघांपैकी दोघांना जुगाराचा नाद असल्याने आणि एकाला प्रेयसीसमोर चमकोगिरी करायची असल्याने या तिघांनी शाैक भागविण्यासाठी दुचाकी चोरीचा मार्ग पत्करल्याचे पोलीस तपासात सांगितले. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवनचे ठाणेदार मुक्तार शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
----