लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नागपूरच्या विधानभवनावर विदर्भाचा झेंडा लावण्यासाठी जात असलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करीत या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.इंग्रजांच्या काळात तिरंगा हाती घेतलेल्या नि:शस्त्र स्वातंत्र्य सैनिकांवर पोलिसांकरवी अत्याचार होत, त्याची आठवण या लाठीहल्ल्यामुळे आली. दुर्दैव हे की हा हल्ला आपल्याच सरकारकडून झाला. त्याहीपेक्षा वैदर्भीय जनतेचे दुर्दैव असे की वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देवून सत्तेवर आलेल्या सरकारच्या पोलीसांनी हा हल्ला केला. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी की या निमित्ताने आपल्या राज्यकर्त्यांचे खायचे दात कोणते आणि दाखवायचे कोणते याचे स्पष्ट दर्शन विदर्भवादी जनतेला झाले. यापुढील निवडणुकीत मतदान करताना विदर्भवादी जनता या हल्ल्याची आठवण विसरणार नाही. या मोर्चाच्या माध्यमातून विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर सरकारचा दुटप्पीपणा उघड केला याबद्दल समिती अभिनंदनास पात्र आहे. तसेच शांततेने जात असलेल्या या मोर्चावर लाठीहल्ला करण्याची परिस्थिती कशामुळे उदभवली याची न्यायालयीन चैकशी करावी, अशी मागणीही जनमंचतर्फे पाटील यांनी केली आहे.