मुंबई - शिवसेना नेते आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरेंनी विधानसभा सभागृहात आमदार म्हणून पहिलंच भाषण केलं. आपल्या पहिल्याच भाषणात आदित्य यांनी भाजपा नेत्यांवर टीका केली. आम्ही पहिल्यांदाच आमदार बनून आलो असून निवडणुकीनंतर पहिल्याच महिन्यात आम्हाला खूप चांगला अनुभव आला. आम्हाला नवख्या आमदारांना खूप शिकायला मिळालं. सत्तेसाठी कोण कुठल्या थराला जातं, कसं सरकार बनतं हे सगळंच आम्हाला पाहायला मिळाल्याचं आदित्य यांनी म्हटलं.
विधानसभेत मी गेल्या 2 दिवसांत खूप गोंधळ बघितलाय. सभागृहातील कामकाज पाहाताना, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहिलं. असं बोललं जातं की चिखलातच कमळ खुलतं. पण, चिखल करा आणि कमळ फुलवा, असं आता महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्रात आता बदल घडलाय, महाराष्ट्रात ही ताकद एकत्र आलेली आहे. गोंधळ सभागृहात घालायचा, गोंधळ बाहेर घालायचा, देश पेटवून ठेवायचा आणि मग राज्य आणायंच ही आमची भूमिका नाही. महाराष्ट्रात भयमुक्त सरकार बनविण्यात यश आलंय. आता, आम्ही भयमुक्त महाराष्ट्र बनवायला निघालो आहोत, असे आदित्य ठाकरेंनी सभागृहात बोलताना म्हटलं.
आपल्या भाषणात प्लास्टीक बंदी, प्रदुषण, पर्यावरण, हवामान या विषयांवरही आदित्य यांनी भाषण केलं. बेरोजगारी हा मोठा विषय आहे, 2016 च्या अंताला नोटबंदी झाली, जीएसटीमुळे उद्योगधंदे बंद झाले. सगळ ठप्प झालंय. त्यामुळे रोजगारासाठी आपल्याला काम करणं गरजेचं असलंय. शिक्षणपद्धतीवरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं. डोनेशन भररुन शिक्षण पूर्ण केल्यानतंरही नोकरी मिळण्याची शाश्वती नाही. त्यामुळे शिक्षण पद्धतीत बदल गरजेचा आहे.
आमदार म्हणून मी पाहतो, मुंबई महापालिकेच्या 1232 शाळा आहेत. त्यामध्ये मराठीसह 8 भाषांमध्ये शिक्षण दिलं जातं. 50 हजार मुलं टॅबवर शिकत आहेत. हे टॅबच शिक्षण आपण गावपातळीवर नेलं पाहिजे, या 1232 शाळांपैकी 500 शाळा ह्या व्हर्च्युअल क्लासरुमशी जोडल्या आहेत. तीच सॅटलाईटची टेक्नॉलॉजी आपण गावपातळीवर नेली पाहिजे. आपण व्हर्च्युअल क्लासरुप आणि डिजिटल एज्युकेशन हे प्रत्येक जिल्ह्यात नेणं गरजेचं आहे, अशी मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करतो, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.