आनंद डेकाटे नागपूर : वन, पर्यावरण, नैसर्गिक सौंदर्य, भौगोलिक संपन्नता आणि उदात्त जीवनमूल्यांचं शहर म्हणून नागपूर शहराचा जगभर गौरव आहे भारताचा मध्यबिंदू ( झिरो माईल) नागपूरच आहे. देशातील सर्व राज्यांना जोडणारा आणि सोयीचे असलेले हे शहर आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे शहर अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे नागपूरला भारताची राजधानी करावी अशी मागणी पीपल्स पँथरचे अध्यक्ष अशोक मेश्राम यांनी शनिवारी आमदार निवास येथे आयोजित पत्रपरिषदेत केली.
ही मागणी केवळ भावनिक नाही तर एकूणच सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या असलेल्या नागपूर शहराचे महत्व आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार केल्यास आवश्यक असल्याचे दिसून येते. ही सध्या मागणी असली तरी ही मागणी लोकांपर्यंत घेऊन जाऊन ही लोकचळवळ करण्याचा आमचा संकल्प आहे. लोकचळवळ झाल्यावर नागरिकांकडून थेट पंतप्रधान व राष्ट्रपतींना यासंदर्भातील निवेदने सादर केली जातील, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला डॉ. भीमराव म्हस्के, ऍड. लटारी मडावी, विनोद मेश्राम उपस्थित होते.