लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : गावखेड्यातील सुरक्षा, शांतता, कायदा आणि सुव्यवस्थेची घडी यथोचित ठेवण्यासाठी पोलीस पाटील महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पूर्वी पोलीस पाटलांच्या नूतनीकरणाचा कालावधी पाच वर्षे होता. आता यात सुधारणा करण्यात आली असून, उमरेड तालुक्यात परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात यावी. नुतनीकरणाचा कालावधी १० वर्षाचा करावा, अशी मागणी प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांच्याकडे निवेदन सोपवित करण्यात आली.
यासंदर्भात पोलीस पाटील संघटना, पोलीस स्टेशन बेला यांच्यावतीने हे निवेदन देण्यात आले. उमरेड तालुक्यात एकूण ७२ पोलीस पाटील आहेत. यापैकी बेला पोलीस ठाण्यांतर्गत २६ पोलीस पाटलांचा समावेश होतो. शासनाने ७ ऑक्टाेबर १९९९ रोजी परिपत्रक काढत पोलीस पाटलांच्या नुतनीकरणाचा कालावधी १० वर्षे केला. असे असतानाही या परिपत्रकाची अंमलबजावणी उमरेड तालुक्यात अद्याप झाली नाही. नुतनीकरणाचा कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष अमित राऊत, सचिव पांडुरंग नाकाडे, उपाध्यक्ष अविनाश वाकडे आदींनी केली आहे.