विद्यार्थ्यांच्या भल्याकरिता योग्य तो निर्णय घ्या : हायकोर्टाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:02 PM2019-07-11T23:02:19+5:302019-07-11T23:03:04+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळे किमान गुण निश्चित केले आहेत. सीबीएसईनुसार ३३ टक्के तर, राज्य मंडळानुसार ३५ टक्के गुण आवश्यक आहे. दहावीनंतर राज्य मंडळाशी संलग्नित विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक सीबीएसई विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. त्यांना प्रवेश नाकारला जात आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यार्थ्यांच्या भल्याकरिता या वादावर चार आठवड्यात योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असा आदेश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळे किमान गुण निश्चित केले आहेत. सीबीएसईनुसार ३३ टक्के तर, राज्य मंडळानुसार ३५ टक्के गुण आवश्यक आहे. दहावीनंतर राज्य मंडळाशी संलग्नित विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक सीबीएसई विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. त्यांना प्रवेश नाकारला जात आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यार्थ्यांच्या भल्याकरिता या वादावर चार आठवड्यात योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असा आदेश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दिला आहे.
इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी राज्य मंडळाने ३५ टक्के तर, सीबीएसईने ३३ टक्के किमान गुण निश्चित केले आहेत. अशास्थितीत राज्य मंडळाने त्यांच्या इयत्ता अकरावी(विज्ञान)मध्ये सीबीएसई विद्यार्थ्यांना प्रवेश देताना किमान ३३ टक्के गुणांचाच निकष पाळायला पाहिजे, असे मत न्यायालयाने आदेशात व्यक्त केले आहे. संबंधित निर्णय घेताना या मतावर विचार करण्यात यावा, असे मंडळाला सांगण्यात आले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
यासंदर्भात बल्लारपूर येथील रोहित मडावी या विद्यार्थ्याने याचिका दाखल केली होती. रोहितने सीबीएसई संलग्नित शाळेमधून इयत्ता दहावी उत्तीर्ण केली आहे. त्याला विज्ञान विषयात ३४ टक्के गुण मिळाले आहेत. आता त्याला, राज्य मंडळाशी संलग्नित गुरू नानक विज्ञान महाविद्यालय (बल्लारपूर, जि. चंद्रपूर) येथे प्रवेश घ्यायचा आहे. परंतु, राज्य मंडळाने त्याला प्रवेश नाकारला आहे. न्यायालयाने वरील आदेश देऊन त्याचे प्रकरण पुनर्विचार करण्यासाठी राज्य मंडळाकडे परत पाठविले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. संदीप नंदेश्वर यांनी कामकाज पाहिले.