नागपूर : व्यापारी आणि नागरिकांसाठी व्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध करून देण्याची मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना निवेदनाद्वारे केली आहे.
चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, देशात दुसऱ्या कोरोना लाटेचा सामना नागरिक करीत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. सरकारने संसर्ग थांबविण्यासाठी आता १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. नियमानुसार लस घेणाऱ्या नागरिकांना ठराविक काळानंतर दुसरा डोस घेणे बंधनकारक असून दुसरा डोस न मिळाल्यास पहिल्या डोसचा प्रभाव आणि शरीराची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे लसीचा कोणताही परिणाम आणि उपयोग होत नाही. ४५ वर्षांवरील बहुतांश नागरिकांची व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्याची वेळ आली आहे.
राज्यासह नागपुरात लस उपलब्ध नसल्याने बहुतांश लसीकरण केंद्र बंद आहेत आणि सुरू असलेल्या केंद्रांवर लोकांना दुसऱ्या डोससाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये वरिष्ठ नागरिकांचे जास्त प्रमाण आहे. अनेकांना उन्हात वाट पाहावी लागत आहे, तर अनेकांना लसीकरणाविना परत जावे लागत आहे.
चेंबरचे उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल म्हणाले, नागपुरात वाढत्या संसर्गामुळे पर्याप्त कोविड व्हॅक्सिनची व्यवस्था सरकारने करावी. प्रशासनाने दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य द्यावे, पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी वेगवेगळी रांग असावी आणि शहरात काही लसीकरण केंद्र दुसरा डोज घेणाऱ्या नागरिकांसाठी आरक्षित ठेवावेत. त्यामुळे नियमांतर्गत सर्व नागरिकांना पहिला आणि दुसरा डोज घेण्यास त्रास होणार नाही. लसीकरणासंदर्भात चेंबरचे सचिव रामअवतार तोतला आणि सदस्य महेश कुकडेजा यांनी लसीकरण मोहीम निरंतर सुरू ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.