ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३ - विदर्भासाठी काँग्रेसने स्वतंत्र प्रदेश कमिटी स्थापन करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री व विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे तज्ज्ञ सदस्य मधुकर उर्फ मामा किंमतकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. सिंचनासाठी संपूर्ण राज्याचा निधी जरी विदर्भाला दिला तरी पुढील २५ वर्षे अनुशेष भरून निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय आता पर्याय नाही, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भातून पुन्हा एकदा घरचा अहेर मिळाला आहे.
किंमतकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विदर्भासोबत केलेला करार कधीच पाळला नाही. सातत्याने अन्याय केला. विदर्भाचा निधी पळवित राहिल्याने विदर्भाचा अनुशेष सातत्याने वाढत राहिला आजही तो वाढलेलाच दिसून येईल. त्यामुळे महाराष्ट्रात राहून विदर्भाचा एकूण विकास करायचा म्हटला तर आणखी १०० वर्षे अनुशेषच भरून निघणार नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे जे नेते आज अखंड महाराष्ट्राची भाषा करीत आहेत त्यांच्यामुळेच विदर्भाचा अनुशेष वाढला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.