लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध सावकारी आणि गुंडगिरीच्या माध्यमातून अनेकांचे आर्थिक शोषण करणाऱ्या तसेच त्यांची मालमत्ता हडपणारा कुख्यात गुंड राकेश वासुदेवराव डेकाडे आणि त्याच्या टोळीतील गुंडांवर पोलिसांनी आज महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अन्वये कारवाई केली. या टोळीचा म्होरक्या राकेश डेकाटे (रा. स्नेहनगर, वर्धा रोड), मदन चंद्रकांत काळे (६२, रा. टिळकनगर, लॉ कॉलेज चौक) आणि महेश अरविंद साबणे (५०, रा. प्रियदर्शनी कॉलनी, सिव्हिल लाइन, नागपूर) हे सध्या कोठडीत असून, राकेशचा भाऊ मुकेश डेकाटे आणि साथीदार नरेश वासुदेवराव ठाकरे (रा. स्नेहनगर) फरार आहे. कुख्यात डेकाटे हा प्रारंभी चेनस्नॅचिंग करायचा. चोरीचे सोने विकून त्याने पैसा जमविला आणि अवैध सावकारी करू लागला. लाख-दोन लाख रुपये देऊन संबंधित गरजूची लाखोंची मालमत्ता लिहून घ्यायची आणि गुंडांच्या मदतीने गरजूला मारहाण करून ती हडपायची, अशी या भामट्याची कार्यपद्धत आहे. त्याने अशा प्रकारे अनेकांच्या मालमत्ता हडपल्या असून, तो कोट्यधीश झाला आहे. धंतोलीतील मोहन दाणी यांनाही त्याने ८ लाख रुपये व्याजाने दिले. त्याबदल्यात १ कोटी रुपये वसूल केले आणि धाकदपटशा करून बनावट कागदपत्रे तयार करीत आरोपी डेकाटे आणि त्याच्या टोळीतील साथीदारांनी त्यांचा बंगलाही हडपण्याचे कट कारस्थान रचले. त्याच्या भीतीपोटी हवालदिल झालेल्या दाणी यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. त्यांची कैफियत ऐकून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हे शाखेला हे प्रकरण सोपविले. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने डेकाटे टोळीच्या पापाची जंत्री उघडली. त्याच्याविरुद्ध २५ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी राकेश डेकाटे, काळे आणि साबणेच्या मुसक्या बांधल्या. मुकेश डेकाटे आणि नरेश ठाकरे फरार आहे. या गुन्हेगारांची संघटित आणि एकसारखी गुन्ह्याची पद्धत बघता पोलिसांनी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त परशुराम कार्यकर्ते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी तपास करून या टोळीविरुद्ध मकोकाचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे सादर केला. त्यांनी आज त्याला मंजुरी दिल्यानंतर मकोका लावण्यात आला. या गुन्ह्यात राकेशचा भाऊ मुकेश डेकाटे आणि साथीदार नरेश वासुदेवराव ठाकरे (रा. स्नेहनगर) फरार आहे.
---
दोन महिन्यांत चवथा मकोका
शहर पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत केलेली मकोकाची ही चवथी कारवाई होय. यापूर्वी बाल्या बिनेकर हत्याकांडातील आरोपी, कुख्यात गुंड संतोष आंबेकर आणि साथीदार, तसेच अन्य एका प्रकरणात मकोकाची कारवाई केली आहे.
---