नागपूर : पूर्व विदर्भातडेंग्यू व डेंग्यू संशयित आजारांचा धोका वाढला असताना यात आता मलेरियाने चिंता वाढवली आहे. मागील आठ महिन्यांत पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून ४८३४ रुग्णांची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.
पावसाला यंदा उशिरा सुरुवात झाली असली तरी साथीच्या आजारांचा झपाट्याने फैलाव होत आहे. पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाॅइड, कॉलरा, कावीळ असे आजार, तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू व डेंग्यू संशयित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
- डेंग्यूचे १२७९ रुग्ण
उपसंचालक नागपूर आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या ८ महिन्यांच्या कालावधीत डेंग्यूच्या १२७९ रुग्णांची नोंद झाली आहे. यात नागपूर जिल्ह्यात ७७५, गोंदिया जिल्ह्यात १४०, चंद्रपूर जिल्ह्यात १३२, गडचिरोली जिल्ह्यात १२३, वर्धा जिल्ह्यात ९०, तर भंडारा जिल्ह्यात १९ रुग्ण आढळून आले आहेत.
- मलेरियाच्या विळख्यात गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यात जनजागृतीसोबतच आवश्यक उपाययोजना केल्या जात असतानाही दरवर्षी हा जिल्हा मलेरियाच्या विळख्यात असतो. राज्यात सर्वाधिक रुग्ण याच जिल्ह्यात आढळून येतात. यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात ४८३४ रुग्णांची नोंद झाली. गोंदिया जिल्ह्यात २१३, चंद्रपूर जिल्ह्यात १२६, भंडारा जिल्ह्यात १७, नागपूर जिल्ह्यात ५, तर वर्धा जिल्ह्यात २ रुग्णांची नोंद झाली आहे.
- मलेरियाच्या रुग्णांत मोठी घट
गडचिरोली जिल्ह्यामध्ये २०१६ मध्ये ३२ हजार रुग्ण आढळून आले होते. मलेरियावर नियंत्रण मिळविण्यासाठी वार्षिक जंतू निर्देशांकानुसार गावांचे वर्गीकरण करण्यात आले. प्रभावित गावांमध्ये जास्तीत जास्त सर्वेक्षण करून उपाययोजना करण्यात आल्या. सोबतच प्रयोगशाळेच्या विकेंद्रीकरणामुळे तत्काळ आजाराचे निदान करून रुग्णाला औषधोपचाराखाली आणण्यात आले. मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. परिणामी, मलेरियाच्या रुग्णांत मोठी घट आली. रुग्णसंख्या आणखी कमी करण्यासाठी विविध आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत.
- डॉ. श्याम निमगडे, सहायक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप)