सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाच्या संसर्गाची भीती ओसरत नाही तोच पूर्व विदर्भ मलेरियाच्या विळख्यात सापडला आहे. मागील वर्षी, जानेवारी ते ऑक्टोबर या दरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या सहा जिल्ह्यात १,८०९ रुग्ण व ५ मृत्यूची नोंद झाली होती. या वर्षी तिपटीने वाढ होऊन रुग्णांची संख्या ५,८३० तर मृत्यूची संख्या १२ वर पोहचल्याने खळबळ उडाली आहे. विशेषत: गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यााठी मागील आठ महिन्यापासून आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहेत. परिणामी, इतर आजारांकडे काहीसे दुर्लक्ष झाल्यासारखे झाले आहे. परंतु लांबलेला पाऊस व जागोजागी पाणी साचून वाढलेल्या डासांमुळे हिवताप म्हणजेच मलेरियाचे रुग्ण वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या दरम्यान भंडारा जिल्ह्यात ६ रुग्ण, गोंदिया जिल्ह्यात २१७ रुग्ण व ३ मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात ४२ रुग्ण, गडचिरोली जिल्ह्यात १५३० रुग्ण व १ मृत्यू, नागपूर जिल्ह्यात १० रुग्ण व एक मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात ४ रुग्णांची नोंद झाली. यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबरमध्ये भंडारा जिल्ह्यात १३ रुग्ण व २ मृत्यू, गोंदिया जिल्ह्यात ३०६ रुग्ण व २ मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात १८४ रुग्ण ३ मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यात ५३१९ रुग्ण व ५ मृत्यू, नागपूर जिल्ह्यात ८ रुग्ण तर वर्धा जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.
-जुलै महिन्यापासून रुग्णसंख्येत वाढ
जुलै महिन्यापासून सहाही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत असली तरी गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक वाढ झाली. या महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात १६६९, गोंदिया जिल्ह्यात १६५ तर चंद्रपूर जिल्ह्यात ४२ रुग्ण आढळून आले. ऑगस्ट महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात ११५३, गोंदिया जिल्ह्यात ८० तर चंद्रपूर जिल्ह्यात ५० रुग्ण, सप्टेंबर महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात ४४०, गोंदिया जिल्ह्यात १५ तर चंद्रपूर जिल्ह्यात २५ रुग्ण तर ऑक्टोबर महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात ४२२, गोंदिया जिल्ह्यात १३ तर चंद्रपूर जिल्ह्यात १० रुग्ण आढळून आले.
-मागील दोन महिन्यापासून रुग्णसंख्या कमी
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. परंतु मागील दोन महिन्यापासून जनजागृतीवर विशेष भर देण्यात आल्याने व आवश्यक उपाययोजना केल्याने रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे.
-डॉ. श्याम निमगडे
सहायक संचालक (हिवताप), आरोग्य विभाग
-धक्कादायक आकडेवारी
जानेवारी ते ऑक्टोबर २०१९
जिल्हारुग्ण मृत्यू
भंडारा ०६ ००
गोंदिया २१७ ०३
चंद्रपूर ४२ ००
गडचिरोली १५३० ०१
नागपूर १० ०१
वर्धा ०४ ००
जानेवारी ते ऑक्टोबर २०२०
जिल्हारुग्णमृत्यू
भंडारा १३ ०२
गोंदिया ३०६ ०२
चंद्रपूर १८४ ०३
गडचिरोली ५३१९ ०५
नागपूर ०८ ००
वर्धा ०० ००