नागपूर : महिला बचतगटाने तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी नागपुरात मॉल उभारण्याची योजना आहे, त्यासाठी मध्यवर्ती जागा शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली.रविभवन येथील सभागृहात सोमवारी आयोजित बैठकीत नितीन गडकरी यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, समितीचे सहअध्यक्ष खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत पवार उपस्थित होते. गावातील रस्ते मोठे करण्यासाठी पांदण विकास योजना राबवावी. जिल्ह्यातील १० हजार युवकांना रोजगार उपलब्ध होतील, अशी कौशल्य विकास योजना तयार करावी, असे निर्देश यावेळी नितीन गडकरी यांनी संबंधितांना दिले. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील नदीच्या खोलीकरणाची योजना राबविता येणे शक्य आहे का? ते तपासून पहावे. गरीब होतकरू व्यक्तींना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज पुरवठा करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. तसेच भूमिअभिलेख कार्यालयातील जनतेची कामे तातडीने होण्यासाठी ५४ मौजा येथे ५४ शिबिरे घेण्यात येतील, असेही गडकरी यांनी सांगितले. यावेळी मनरेगा, इंदिरा आवास योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, निर्मल स्वच्छ भारत अभियान, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, भूमी अभिलेख आदी योजनांचा आढावाही गडकरी यांनी घेतला. या बैठकीस आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार समीर मेघे, आमदार आशिष देशमुख, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, आमदार सुधाकर कोहळे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने उपस्थित होते. (प्रतिनिधी)आमदारांशी समन्वय ठेवून योजना राबवाव्यात ४नागपूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे राबविण्यात येणाऱ्या व राबविण्यात आलेल्या योजनांचे अहवाल पालकमंत्री आणि आमदारांना नियमितपणे देण्यात यावे. विविध योजनांचे लाभार्थी निवडताना निकषांना न डावलता आमदारांच्या सूचना मागवाव्यात. नागपूर जिल्ह्यात झालेल्या कामाची यादी विधानसभा क्षेत्रनिहाय तयार करून ती संबंधित आमदारांना देण्यात यावी, अशा सूचनाही केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना केल्या. आश्रमशाळांची अवस्था व कार्यालयामार्फत होणारी कामे याकरीता आ.सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे आणि आशिष देशमुख यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
बचत गटांसाठी मॉल कल्चर
By admin | Published: August 18, 2015 3:26 AM