नागपूर : नागपूर जिल्ह्यात ९०२ बालके कुपोषणाच्या छायेत आहेत. यात मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) ७२६ तर, अतितीव्र कुपोषित (सॅम) १७२ बालकांचा समावेश आहे. मात्र, शहरातील मुलांचे वाढते वजन चिंतेचा विषय ठरला आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे मुलांच्या लठ्ठपणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
कोरोनामुळे शहरातील शाळा आजही बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे मुलांच्या हातात मोबाइल, टॅब व लॅपटॉप आला आहे. टीव्ही आणि मोबाइलसमोर मुलांचा अधिकतर वेळ जात आहे. यातच कोरोनाच्या भीतीने मैदानी खेळ बंद झाले आहेत. कोरोना होऊ नये म्हणून प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊ घातले जात आहेत. परिणामी, मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. तज्ज्ञांनुसार, साधारण १० टक्के मुलांमध्ये लठ्ठपणा असतो. परंतु मुले घरीच राहत असल्याने ही संख्या १५ ते २० टक्क्यांवर गेली आहे.
-शहरांत स्थूलता ही नवी समस्या
लठ्ठपणामुळे मुलांच्या विकासावर मानसिक आणि सामाजिक प्रभाव पडतो. लठ्ठ मुले किशोर वयातही लठ्ठच राहण्याची शक्यता अधिक असते. यामुळे किशोवरयात हायपरटेन्शन, जास्त कोलेस्ट्रॉल, मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर, लिव्हरचे आजार होण्याची शक्यता वाढते. यामुळे शहरातील मुलांमध्ये वाढती स्थूलता ही नवी समस्या असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वजन वाढण्याची ही आहेत कारणे
ज्यांचे पालक वा कुटुंबातील सदस्य लठ्ठ असतील, त्यांच्यात लठ्ठपणा असण्याची शक्यता जास्त असते. कोरोना निर्बंधामुळे घराबाहेर पडता येत नसले तरी आता घरपोच खाद्यपदार्थ मिळत असल्याने उच्च उष्मांकयुक्त पदार्थ (हाय कॅलरी फूड) सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांची जीवनशैलीही लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरत आहे. विशेषत: लहान मुले टीव्ही आणि मोबाइलवर फार वेळ घालवत आहेत. मैदानी खेळ व शारीरिक क्रिया करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
जिल्ह्यातील कुपोषित बालके
कुपोषित -७२६
तीव्र कुपोषित -१७२
मुलांच्या लठ्ठपणाकडे वेळीच लक्ष द्या
आपले मूल गुबगुबीत आहे, लठ्ठ आहे यामुळे ते निरोगी आहे असा जर समज असेल तर तो काढून टाका. लहान मुले लठ्ठ असतील तर त्यांना हृदयरोगाचा धोका अधिक असतो. रक्तवाहिन्यांसंबंधी रोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब आदी विकार, दमा आणि श्वसनाचे विकारही आढळू शकतात. दमा, पित्त आणि झोपेच्या आजारांच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे मुले लठ्ठ होणार नाहीत याची काळजी घ्या किंवा वजन नियंत्रणात आणण्यासाठी आतापासून सुरुवात करा.
- डॉ. राजेश अग्रवाल, बालरोग तज्ज्ञ
बाहेरील खाद्य पदार्थ घरी मागवणे टाळा
बालकांचे वजन कमी करायचे असेल किंवा वजन वाढू द्यायचे नसेल तर बाहेरील खाद्य पदार्थ घरी मागवू नये किंवा ते कमी करायला हवे. पालकांनी मुलांसाठी वेळ काढायला हवा. मुलांसोबत मॉर्निंग वॉक, योगा, प्राणायाम करायला हवे. बाहेर जाता येत नसेल तर घरी, गच्चीवर व्यायाम करावा. पालकांनी स्वत:सह मोबाइल व टीव्हीचा वेळ मर्यादित करावा. ठरावीक वेळेसाठीच त्याचा वापर करावा.
- डॉ. मोहन येंडे, आयुर्वेद तज्ज्ञ
पालकांची चिंता वाढली
एका पालकाने सांगितले, १७ महिन्यांपासून बालके घरी आहेत. बाहेर पाठविणेही धोकादायक आहे. यामुळे नाइलाजाने मुलांची इच्छा पूर्ण केली जात आहे. हवे ते खाद्य पदार्थ तयार करणे किंवा बाहेरून मागवणे, मोबाइलवर अधिक वेळ खेळू देणे, दुपारी झोपणे यामुळे लठ्ठपणा वाढला आहे.