लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपमहापौरांच्या निधीतून मर्जीतील कंत्राटदारांच्या कामांना मंजुरी दिली जात आहे. यात गैरप्रकार सुरू आहे. उपमहापौरांनी वाटप केलेल्या निधीतील कामे थांबवून या प्रकरणाची चौकशी करावी. अशी मागणी मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली आहे.
उपमहापौर मनिषा धावडे यांनी दोन कोटींच्या निधीचे नगरसेवकांना वाटप करताना मर्जीतील कंत्राटदारांच्या माध्यमातून कामे केली जात आहे. यात प्रामुख्याने तीन लाखांपर्यंतच्या कामाचा समावेश आहे. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली झालेली आहे. नगरसेकांनी कामे सुचविलेली असली, तरी ती उपमहापौरांच्या मर्जीतील कंत्राटदारांकडून केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी तानाजी वनवे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे. प्रशासनाने चौकशी न केल्यास, या संदर्भात न्यायालयात जाण्याचा इशाराही वनवे यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे, दुर्बल घटकांच्या निधी वाटपातील गैरप्रकार गाजत आहे. सत्तापक्षाची बदनामी होत आहे. त्यात उपमहापा विरोधात आयुक्तांकडे तक्रार केल्याने मनपातील राजकारण चांगलेच तापले आहे.
...
आयुक्तांनी चौकशी करावी : धावडे
निधी वाटपात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांचीही एक फाइल मंजूर केली. दोन कोटींच्या निधीतून सर्व नगरसेवकांचे समाधान शक्य नाही. वनवे यांनी केलेल्या मागणीनुसार, निधी वाटपाची मनपा आयुक्तांची चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया उपमहापौर मनिषा धावडे यांनी दिली.